महापालिकेची डोळेझाक,आरटीओ मेहरबान;छत्रपती संभाजीनगरात फिटनेस नसलेले टँकर रस्त्यावर!
By मुजीब देवणीकर | Updated: April 4, 2023 20:15 IST2023-04-04T20:14:35+5:302023-04-04T20:15:00+5:30
महापालिकेने शहरातील टँकरद्वारे पाणी वितरणाचा ठेका राम इन्फ्रास्ट्रक्चर या खासगी कंपनीला दिला आहे.

महापालिकेची डोळेझाक,आरटीओ मेहरबान;छत्रपती संभाजीनगरात फिटनेस नसलेले टँकर रस्त्यावर!
छत्रपती संभाजीनगर : शहरात जिथे जलवाहिन्या नाहीत, त्या भागातील नागरिकांची तहान टँकरद्वारे भागविण्यात येते. या कामासाठी खासगी कंत्राटदारामार्फत नियुक्त ८० पेक्षा अधिक टँकरला आरटीओचे फिटनेस प्रमाणपत्र नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिका प्रशासनही या गंभीर विषयाकडे डोळेझाक करीत आहे. सोमवारी सकाळी कंत्राटदाराच्या टँकरमुळे एका भावी निष्पाप डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाला. याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिकेने शहरातील टँकरद्वारे पाणी वितरणाचा ठेका राम इन्फ्रास्ट्रक्चर या खासगी कंपनीला दिला आहे. कंपनीने हे कंत्राट पेट्रोल, डिझेल, दुधाचे टँकर दाखवून घेतले. मनपाला दाखविण्यात आलेला एकही टँकर पाण्यासाठी वापरला जात नाही. कालबाह्य झालेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर टँकर बसवून, काही आरटीओची परवानगी नसलेले ८० टँकर धावत आहेत. टँकरची मूळ कागदपत्रेच नसल्यामुळे आरटीओकडून फिटनेस प्रमाणपत्रही मिळू शकत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे महापालिकेतील अधिकाऱ्यांनीही कंत्राटदाराला फिटनेस प्रमाणपत्र मागितले नाही.
मागील महिन्यात कंत्राटदाराचा एक टँकर कामगार चौकात चक्क एका कारवर चढला. कारचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतरही मनपा अधिकाऱ्यांनी कोणताही बोध घेतला नाही. कंत्राटदाराला आजपर्यंत चार ओळींची साधी नोटीसही देण्यात आलेली नाही.
नागरिकांच्या जिवाशी खेळ
शहरात मनपाच्या कंत्राटदाराचे जवळपास ८० टँकर धावतात. या टँकरचे कागदपत्रच मनपाकडे नाहीत. कंत्राटदाराकडेही नाहीत. ज्यांचे टँकर आहेत, त्यांच्याकडेही नाहीत. यामध्ये मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही काही टँकर आहेत. धोकादायक टँकरद्वारे नागरिकांच्या जिवासोबत खेळ सुरू आहे.
पाणी प्रचंड मुरतंय...
महापालिकेतील ही टँकर लॉबी एवढी मोठी आहे की, कायदा त्यांच्यासमोर काहीच नाही. ‘लोकमत’ने या अनागोंदी कारभाराबद्दल वृत्तमालिकाच प्रकाशित केली होती. भ्रष्टाचाराचं पाणी एवढं मुरतंय की, प्रशासनाने दोषी कंत्राटदारावर कारवाई केली नाही.
काय म्हणाले अधिकारी?
‘लोकमत’ने पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता के.एम. फालक यांना काही प्रश्न विचारले. ते खालीलप्रमाणे -
प्रश्न- ८० टँकरचे फिटनेस मनपाकडे जमा आहे का?
उत्तर - एकाचेही फिटनेस आजपर्यंत दिलेले नाही.
प्रश्न- आज सकाळी एक अपाघात झाला, माहीत आहे का?
उत्तर- आम्हाला कोणीही माहिती दिली नाही.
प्रश्न- कामगार चौकात मागील महिन्यात अपघात झाला होता?
उत्तर- यासंदर्भातही आपल्याला काहीच कल्पना नाही.
प्रश्न- टँकरला इंडिकेटर्स आहेत का, चालू आहेत हे कोणी तपासायचे?
उत्तर- ही मनपा पाणीपुरवठा विभागाचीच जबाबदारी आहे.
प्रश्न- कंत्राटदाराला आजपर्यंत या चुकीबद्दल एक नाेटीस तरी दिली का?
उत्तर- अजिबात नाही.
प्रश्न- मनपाकडून एवढी डोळेझाक कशी होऊ शकते?.
उत्तर- अपघात होणे गंभीर, वाईटच झाले आहे.