शिंदेसेनेचे राजेंद्र जंजाळ येण्याच्या चर्चेने छत्रपती संभाजीनगर भाजपातील अनेकांमध्ये अस्वस्थता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 15:45 IST2025-12-01T15:43:30+5:302025-12-01T15:45:02+5:30
चर्चा तर होणारच : न. प. निवडणुकीनंतर शिंदेसेना घेणार आढावा

शिंदेसेनेचे राजेंद्र जंजाळ येण्याच्या चर्चेने छत्रपती संभाजीनगर भाजपातील अनेकांमध्ये अस्वस्थता
छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्री संजय शिरसाट आणि शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यात मागील काही महिन्यांपासून नाराजीचे वादळ उठले आहे. हे वादळ आता शिंदेसेनेचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात न. प. निवडणुकीनंतर शमणार आहे. असे असले तरी जंजाळ भाजपमध्ये येण्याच्या चर्चेने भाजपच्या गाेटात अस्वस्थता निर्माण होऊ लागली आहे.
पालकमंत्री शिरसाट यांच्या विरोधात जंजाळ यांनी सार्वजनिकरीत्या टीकास्त्र सोडल्यामुळे पालकमंत्र्यांचा तीळपापड झाला. तुम्हाला जिकडे जायचे तिकडे जा, थांबविले कुणी? असे उत्तर देत, जंजाळ हे शिंदेसेनेतून बाहेर पडले तरी काहीही फरक पडणार नाही, असे संकेत शिरसाट यांनी दिले. आता उपमुख्यमंत्री शिंदे याबाबत काय निर्णय घेतात, याकडे लक्ष आहे.
दरम्यान, जंजाळ हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने भाजपमधील एका गटात अस्वस्थता पसरली आहे. जंजाळ यांच्यासह त्यांचे १० हून अधिक समर्थक पक्षात येणार असल्याची चर्चा आहे. त्या सर्वांना उमेदवारीचा शब्द घेऊनच ते पक्षात प्रवेश करतील, अशी कुजबुज भाजपमधील इच्छुकांमध्ये आहे. तसे झाल्यास मूळ भाजपचे जे इच्छुक पदाधिकारी आहेत, ते भाजपमधून बाहेर पडू शकतात. उमेदवारी न मिळाल्यास दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारीचा बी प्लॅन भाजपमधील इच्छुकांनी तयार करून ठेवण्यावर विचार सुरू केला आहे. तसे झाल्यास भाजपलाही मोठे खिंडार पडेल.
तोडगा नाही निघाला तर... भाजप की उद्धवसेना?
पूर्व मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत जंजाळ यांनी महायुतीसाठी परिश्रम घेतल्यामुळे भाजपमधील काही जण जंजाळ यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे जंजाळ यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याबाबत भाजपमधील एक फळी सकारात्मक आहे. त्यामुळेच भाजपमधील एका गटात नाराजीचा सूर आहे. जंजाळ यांचे समर्थक तिन्ही मतदारसंघात आहेत. शिंदेसेनेत काही तोडगा निघाला नाही तर ते इतर पक्षांत समर्थकांसह जाऊ शकतात. दुसरीकडे जंजाळ उद्धवसेनेच्या युवासेनेच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचीदेखील चर्चा आहे. नगरपरिषद निवडणुकीनंतर याप्रकरणी उपमुख्यमंत्री बैठक घेणार असल्याचे शिंदेसेना सूत्रांनी सांगितले.
त्यांना भाजपमध्ये घेण्याबाबत निर्णय नाही
शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख जंजाळ यांना भाजपमध्ये घेण्याबाबत काहीही निर्णय पक्षपातळीवर झालेला नाही. परंतु जंजाळ यांच्याशी भेटी-गाठी होत आहेत. भाजपला असलेले भविष्य, आमचे वर्क कल्चर, यामुळे अनेकांना पक्षात यायचे आहे.
- किशोर शितोळे, शहराध्यक्ष, भाजप