'माझ्या जरांगे दादाची काळजी घ्यावी'; मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाचा टोकाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 14:39 IST2023-10-31T14:38:19+5:302023-10-31T14:39:06+5:30
मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यार नसल्याची भूमिका नातेवाइकांनी घेतली आहे.

'माझ्या जरांगे दादाची काळजी घ्यावी'; मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाचा टोकाचा निर्णय
फुलंब्री : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कोलठानवाडी येथील २४ वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी टोकाचा निर्णय घेत स्वतःचे आयुष्य संपवले. त्याच्या जवळील चिठीत, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, माझ्या जरांगे दादाची काळजी घ्यावी, असे लिहिलेले आढळून आहे. शुभम अशोक गाडेकर असे मृत तरुणाचे नाव असून आज सकाळी ही घटना उघडकीस आली.
कोलठानवाडी येथील शुभम अशोक गाडेकर हा वडिलांसोबत मजुरी करत असे. आज सकाळी साडेआठ वाजता शुभम घराबाहेर पडला.गावालगत असलेल्या पोखरी शिवारातील एका शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. सकाळी साडेदहा वाजता एका ग्रामस्थाने एका तरुणाने गळफास घेतल्याचे पाहिले. त्याने गावात याची माहिती दिली. हा तरुण कोलठान वाडी येथील शुभम गाडेकर असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या खिशात एक चिट्ठी आढळून आली. त्यात माझ्या समाजाला आरक्षण मिळावे व माझ्या जरांगे दादाची काळजी घ्यावी असे लिहलेले आढळून आले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. उपविभागीय अधिअक्रि रोडगे,उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत भवर ,तहसीलदार मुनलोड ,पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांनी घटनास्थळी भेट दिली.
तोपर्यंत मृतदेह ताब्यात नाही घेणार
दरम्यान, शुभम गाडेकर यांचे पार्थिव शवविच्छेदनसाठी घाटी रुग्णालयात आणण्यात आले आहे. याठिकाणी मोठी गर्दी झाली आहे. कुटूंबाला आर्थिक मदत, कुटूंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे या मागण्या पूर्ण होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.