छत्रपती संभाजीनगर: शहरातील राजाबाजार, कुंवारफल्ली परिसरात शनिवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या वादात तलवारीसारखी धारदार शस्त्रे उपसली गेल्याने परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. स्थानिक वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक तरुणांच्या दोन गटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. शनिवारी मध्यरात्री हे दोन्ही गट आमने-सामने आले आणि त्यांच्यात जोरदार हाणामारी सुरू झाली. यावेळी एकमेकांवर लाठ्याकाठ्या आणि शस्त्रांनी हल्ला चढवण्यात आला. या घटनेदरम्यान एका तरुणाने थेट तलवार उपसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. स्थानिक लोकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत यातील अनेक तरुण पसार झाले होते.
या घटनेनंतर रविवारी पोलिसांनी यातील काही आरोपींचा शोध घेतला. परंतु, कोणीही पोलिसांच्या हाती लागले नाही. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या हाणामारीत एकापेक्षा जास्त तलवारींचा वापर झाला होता, मात्र पोलिसांनी केवळ एकच तलवार वापरली गेल्याचे सांगितले. या प्रकरणातील आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. या घटनेमुळे शहराच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.