सुराज्याचे स्वप्न राजमाता जिजाऊंचे
By Admin | Updated: January 17, 2016 00:04 IST2016-01-16T23:29:57+5:302016-01-17T00:04:36+5:30
औरंगाबाद : सुराज्याचे स्वप्न हे राजमाता जिजाऊंचे होते आणि ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर बारा वर्षांनी त्यांनी जगाचा निरोप घेतला, असे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

सुराज्याचे स्वप्न राजमाता जिजाऊंचे
औरंगाबाद : सुराज्याचे स्वप्न हे राजमाता जिजाऊंचे होते आणि ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर बारा वर्षांनी त्यांनी जगाचा निरोप घेतला, असे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शनिवारी राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमात केले.
युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले युवा मंचतर्फे आयोजित राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव २०१६ निमित्त ख्यातनाम वक्ते प्रदीपदादा सोळुंके यांचे रामनगरातील सुशीलादेवी देशमुख विद्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आ. सतीश चव्हाण होते. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, तर स्वागताध्यक्षा म्हणून जिल्हा परिषद सदस्य अनुराधाताई चव्हाण होत्या.
यावेळी मुंडे म्हणाले की, जिजाऊंनी आयुष्यभर सुराज्याचाच विचार केला. शिवाजीराजेंचा स्वराज्याभिषेक झाल्यानंतर बारा वर्षांनी त्यांनी जगाचा निरोप घेतला. जिजाऊंनी शिवाजीराजांना जे धडे दिले त्यामुळेच शिवाजी महाराज हे समतेचे आणि सहिष्णुतेचे खरे उदाहरण ठरले. आपल्या मुलाबाळांच्या हितासाठी जिजाऊंएवढाच कणखरपणा प्रत्येक माता-भगिनीने निर्माण केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या व्याख्यानात प्रदीप सोळुंके यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले हे त्यांचे मोठेपण आहेच; परंतु विविध जाती-धर्मांच्या अठरापगड लोकांची मने जिंकली हे त्यांचे मोठे कर्तृत्व आहे. राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना महिलांचा सन्मान राखायला शिकविले आणि त्यामुळेच महाराजांनी महिलांवर अन्याय करणाऱ्यांना जबर शिक्षा दिल्या.
यावेळी अनुराधाताई चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, महिला आघाडीच्या अध्यक्षा मेहराज पटेल, माणिकराव शिंदे यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक अक्षय सोळुंके, अमोल रंधे, भागवत गाठाळ, अंकिता विधाते, पंकजनाना देशमुख, अजय चिकटगावकर, भाग्यश्री राजपूत आदींची उपस्थिती होती. यावेळी शाहीर समाधान इंगळे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम झाला.