स्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाड्यात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 15:55 IST2025-11-17T15:55:10+5:302025-11-17T15:55:31+5:30
कारागृहात डांबल्यानंतरही मुक्तीसंग्रामाचा लढा सुरूच होता: मुख्यमंत्री

स्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाड्यात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली: देवेंद्र फडणवीस
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तीसंग्रामची ज्योत पेटवणारे स्वामी रामानंद तीर्थ यांना चार महिने कारागृहात डांबण्यात आले. त्याचा काहीच फरक पडला नाही. या लढ्यात अनेक नेते तयार झाले होते, त्यांनी ही ज्योत पेटवत ठेवली. कारागृहातून बाहेर आल्यानंतरही त्यांनी हैदराबाद आणि मराठवाड्यात हा लढा अधिक तिव्र केला. महिला, तरुण मोठ्या संख्येने त्यात सहभागी झाले. त्यामुळे मराठवाडा १७ सप्टेंबर १९४८ मध्ये निझामांच्या जोखडातून मुक्त झाला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
क्रांतीचौकातील स्वातंत्र्यसंग्राम स्मारक स्थळी (झाशीची राणी उद्यान) स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा उभारलेल्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी इतर मागासवर्ग बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, खा. संदीपान भुमरे, खा. डॉ. भागवत कराड, आ. संजय केणेकर, आ. अनुराधा चव्हाण, भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे, माजी आ. डी. के. देशमुख, डॉ. शिरीष खेडगीकर, सारंग टाकळकर, शिरीष बोराळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतीचे जतन होत आहे, ही मोठी बाब आहे. खेडगीकर कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पुढे त्यांनी दीक्षा घेतली आणि ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. स्वामी विवेकानंद यांनी ज्या पद्धतीने देशभर आपल्या कार्याने नागरिकांमध्ये देशभक्तीचा संचार केला त्याच पद्धतीने रामानंद तीर्थ यांनी मराठवाड्यात काम केले. देश १९४७ मध्ये स्वातंत्र झाला. सरदार पटेल गृहमंत्री असताना त्यांनी घेतलेली भूमिकाही यात महत्वाची ठरली. त्यानंतर तब्बल १३ महिन्यानंतर मराठवाडा निझाम, रझाकारांच्या तावडीतून मुक्त झाला. दरवर्षी १७ सप्टेंबरला आपण याचे नामस्मरण करतो, असेही त्यांनी नमूद केले. पुतळा तयार करणारे निरंजन मडीलगेकर, चबुतऱ्याचे काम करणारे बीडवेल कन्सट्रक्शनचे मेहराज सिद्दीकी यांचा सत्कारही मुख्यमंत्र्यांनी केला.