‘सर्वोपचार’मधील सीएमओ निलंबित

By Admin | Updated: August 7, 2014 01:41 IST2014-08-07T01:39:56+5:302014-08-07T01:41:11+5:30

लातूर : बेजबाबदार आणि हलगर्जीपणामुळे एका जिवंत व्यक्तीलाच सर्वोपचार रुग्णालयातील एका डॉक्टराने मयत घोषित केले होते.

Suspended CMO in 'All-Aid' | ‘सर्वोपचार’मधील सीएमओ निलंबित

‘सर्वोपचार’मधील सीएमओ निलंबित

 

या प्रकरणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी सीएमओला निलंबित केले आहे. परंतु, सदर प्रकरणी चुकीची माहिती माध्यमाला पोहोचविली असल्याचे खापर अधिष्ठातांनी पोलिसांवर फोडले आहे. शिवाय, मयत घोषित केलेल्या ‘त्या’ व्यक्तीला शवविच्छेदनासाठी शवागारात नेले नव्हते. ट्रामामध्येच ठेवले होते, असे स्पष्टीकरण अधिष्ठातांनी केले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात २ आॅगस्ट रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास अपघातात गंभीर जखमी झालेल्या अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील हिरालाल माणिकलाल पतालिया यांना चाकूर पोलिसांनी दाखल केले होते. दाखल केल्यानंतर हिरालाल यांच्यावर उपचारही करण्यात आले. परंतु, ते जिवंत असताना तेथील डॉक्टरांनी हिरालाल यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी सीएमओच्या अहवालानुसार गांधी चौक पोलिसात एमएलसीही दाखल झाली होती. त्यानुसार पंचनाम्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले, असे गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एन.बी. रणझुंजारे यांचे म्हणणे आहे. परंतु, रुग्णालय प्रशासनाच्या न्याय वैद्यकशास्त्र विभागाकडून पंचनाम्यासाठी पोलिसांना बोलाविण्यात आले नव्हते, असे अधिष्ठाता डॉ. दीप्ति डोणगावकर यांनी स्पष्ट केले आहे. जिवंत माणसाला मयत घोषित केले, हे सत्य असल्याचे अधिष्ठाता म्हणतात. परंतु, शवागारात शवविच्छेदनासाठी ‘त्या’ जिवंत, परंतु मयत घोषित केलेल्या हिरालाल यांना नेले नव्हते, असेही अधिष्ठाता सांगतात. शवागारात नेल्याचे वृत्त प्रकाशित झाल्याने रुग्णालयाची नाचक्की झाली. परंतु, जिवंत व्यक्तीला मयत घोषित केल्याने झालेली नाचक्की सीएमओ अविनाश कावळे यांच्या निलंबनाच्या रुपाने झाकण्यात आली आहे. (प्रतिनिधी)रुग्णाचा मृत अहवाल सीएमओकडून चुकीने पोलिसांकडे गेला आहे. या चुकीकरिता संबंधित डॉक्टरास निलंबित केले आहे. परंतु, अनोळखी मृत घोषित केलेल्या व्यक्तीला शवागारात नेले नव्हते. तसेच न्याय वैैद्यकशास्त्र विभागात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांकडे पोलिसांकडून शवविच्छेदन करण्याची विनंती करण्यात आली नव्हती. सर्वोपचार रुग्णालयात रुग्णसेवेचे पवित्र कार्य सुरू आहे, असे अधिष्ठाता डॉ. दीप्ति डोणगावकर यांनी सांगितले.डेथ एमएलसी पोलिसात दाखल झाल्यानंतर पंचनाम्यासाठी कोणीही बोलाविण्याची गरज नाही. हिरालाल प्रकरणी एमएलसी दाखल झाली होती. त्यानुसार पोलिस पंचनाम्यासाठी गेले होते. पोलिसांनीच ‘ती’ व्यक्ती जिवंत असल्याचे डॉक्टरांना सांगितले. डेथ झाल्यानंतर पुढील कार्यवाही करणे पोलिसांचे काम आहे, असे गांधी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी सांगितले.राज्य शासनाने अपघातस्थळावरून अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी अत्याधुनिक अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा सुरू केली आहे. परंतु, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातील अपघात विभागात रात्रीच्या वेळी प्रशिक्षणार्थी डॉक्टर असतात. अनुभवी डॉक्टरांना रात्रीची ड्युटी बहुदा नसतेच. त्यामुळेच असा प्रकार घडला असावा, अशी चर्चा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय परिसरात बुधवारी दिवसभर होती.

Web Title: Suspended CMO in 'All-Aid'