आश्चर्यच ! यंदा लाचखोरांमध्ये पंधरा टक्क्यांनी घट; भ्रष्टाचारात छत्रपती संभाजीनगर राज्यात तिसरे
By सुमित डोळे | Updated: December 25, 2024 18:33 IST2024-12-25T18:32:25+5:302024-12-25T18:33:19+5:30
कोरोनाचे वर्ष वगळता पहिल्यांदाच दहा वर्षांत सर्वाधिक कमी ७०१ कारवाया, १३१६ कारवायांसह २०१४ ठरले होते सर्वाधिक लाचखोरीचे वर्ष

आश्चर्यच ! यंदा लाचखोरांमध्ये पंधरा टक्क्यांनी घट; भ्रष्टाचारात छत्रपती संभाजीनगर राज्यात तिसरे
छत्रपती संभाजीनगर : सर्वसामान्यांच्या कामांसाठी होणाऱ्या लाचखोरीत यंदा घट झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यात १५ टक्क्यांनी यंदा कारवाईत घट झाली आहे. राज्यात पहिल्यांदा कोरोनाचे २०२० चे वर्ष वगळता दहा वर्षांमध्ये सर्वाधिक कमी ७०१ लाचखोर अडकले गेले. १३१६ कारवायांसह २०१४ हे सर्वाधिक लाचखोरीच्या कारवायांचे वर्ष ठरले होते.
गलेगठ्ठ पगार, अन्य सोयीसुविधा असतानाही शासकीय अधिकारी, कर्मचारी अधिकच्या पैशांच्या हव्यासापोटी अडकले जातात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सातत्याने कारवाया होतानादेखील लाचखोरांचे प्रमाण कायम राहत आले होते. गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत २०२४ मध्ये २२ डिसेंबरपर्यंत सापळे, अपसंपदा व भ्रष्टाचाराच्या सर्वाधिक कमी ७०१ कारवायांची नोंद झाली आहे. मात्र, सापळ्यात रंगेहाथ सापडूनही संबंधित विभागांकडून निलंबनाच्या कारवाईत दिरंगाई केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात अद्यापही २७ लाचखोरांचे निलंबन बाकी असून, यात सर्वाधिक ग्रामविकास खात्याच्या कर्मचाऱ्यांची संख्या आहे.
परिक्षेत्रात संभाजीनगरात अधिक
जिल्हा - सापळे - २०२४ (२२ डिसेंबर अखेर)- २०२३
छत्रपती संभाजीनगर - ४१ - ४६
जालना - २२ - २७
बीड - २२ - २६
धाराशिव - २४ - २६
राज्यात तिसऱ्या क्रमांकावर कायम
लाचखोरीत छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र २०२४ मध्येदेखील सापळे, अपसंपदा व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे.
परिक्षेत्र - प्रकरण
नाशिक - १४७
पुणे - १४३
छत्रपती संभाजीनगर - ११२
ठाणे - ७०
अमरावती - ६८
नागपूर - ६२
नांदेड - ६१
मुंबई - ३८
कोरोनानंतर सर्वाधिक कमी २०२४ मध्येच
वर्षे - एकूण गुन्हे
२०१४ - १३१६
२०१५ - १२७९
२०१६ - १०१६
२०२० - ६६३
२०२३ - ८१२
२०२४ - ७०१६
‘महसूल’मध्ये सर्वाधिक लाचखोर
लाच घेण्यात दहा वर्षांपासून महसूल विभाग सर्वोच्च स्थानी राहिला आहे. राज्यभरात या विभागाच्या १७६ सापळ्यांत ३४ लाख ४४ हजार ९८० रुपयांची लाचेची रक्कम जप्त करण्यात आली. त्या खालोखाल १३३ पोलिस, ६६ पंचायत समिती, ४० जिल्हा परिषद, ३७ कारवाया शिक्षण विभागात झाल्या.
साहेबांसाठी ‘क्लास थ्री’च तोफेच्या तोंडी
हजारो, लाखो रुपयांची लाच घेताना सर्वाधिक ४९९ लाचखोर हे वर्ग ३ चेच अडकले गेले. त्या खालोखाल वर्ग ४ चे ४७, वर्ग २ चे ९८ तर वर्ग १ चे म्हणजेच ६२ साहेब लाच घेताना रंगेहाथ सापडले.
ऑनलाइनही करा तक्रार
कुठल्याही शासकीय विभागात लाच मागून त्रास दिला जात असेल तर तुम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या https://www.acbmaharashtra.gov.in/bribe-complaint या संकेतस्थळावर त्याची थेट तक्रार करू शकता. शिवाय, १०६४ या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही तक्रार नोंदवू शकता.