सुपर! 'कस्टमर सॅटिस्फॅक्शन' मध्ये छत्रपती संभाजीनगर विमानतळ देशात 'टॉप'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 20:27 IST2025-12-27T20:26:45+5:302025-12-27T20:27:26+5:30
विमानतळावरील प्रवाशांच्या अनुभवांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी ग्राहक समाधान सर्वेक्षण करण्यात आले.

सुपर! 'कस्टमर सॅटिस्फॅक्शन' मध्ये छत्रपती संभाजीनगर विमानतळ देशात 'टॉप'
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरविमानतळाने देशातील सर्व विमानतळांना मागे टाकत ''टॉप'' विमानतळ म्हणून झेप घेतली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणअंतर्गत देशभरातील ६२ विमानतळांवर जुलै ते डिसेंबर २०२५ या कालावधीत करण्यात आलेल्या ''कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्व्हे–राऊंड २ ''मध्ये छत्रपती संभाजीनगर विमानतळाने पहिला क्रमांक मिळवला आहे.
''एएआय''कडून नियमितपणे हे सर्वेक्षण केले जाते. यंदाही देशभरातील एकूण ६२ विमानतळांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यांना विविध निकषांतील त्यांच्या कामगिरीच्या आधारे गुण देण्यात आले आणि मूल्यांकनाच्या आधारे ५ पैकी रेटिंग देण्यात आली. खजुराहो, भोपाळ आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळ यांना ५ पैकी ४.९९ रेटिंग मिळाले. हे तिन्ही विमानतळ पहिल्या स्थानी आहेत.
दिवसभरात १०० उड्डाणे घेण्याची क्षमता
छत्रपती संभाजीनगर विमानतळ २०२४ मध्ये ४.८७ रेटिंग घेऊन देशात १३व्या स्थानी होते. त्यानंतर जुलैमध्ये ''टॉप-१०''मध्ये येत विमानतळाने देशात ८ वे स्थान मिळविले. आता छत्रपती संभाजीनगर विमानतळाने यंदा ०.०६ गुणांनी आपल्या रेटिंगमध्ये सुधारणा करीत आठव्या स्थानावरून पहिल्या स्थानावर उड्डाण घेतले. असे असले तरी येथून दिवसभरात १०० उड्डाणे घेण्याच्या क्षमतेचा वापर होत नाही.
विविध सुविधांमुळेच हे शक्य
आम्ही केलेल्या नवीन सुविधांमुळे हे शक्य झाले आहे. टर्मिनल इमारतीतील सर्व स्वच्छतागृहांचे नूतनीकरण केले. प्रवाशांकडून स्वच्छतेबाबत चांगला प्रतिसाद मिळतो. पार्किंग क्षेत्रात ईव्ही चार्जिंग स्टेशनची सुरुवात, लायब्ररीची सुविधा, लहान मुलांसाठी चाइल्ड प्ले एरिया'' तयार केला. प्रवासी हाताळण्याची क्षमता ८०० वरून २ हजार ८५० पर्यंत वाढविली. विमानतळाला आणखी उंची गाठण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- शरद येवले, संचालक, छत्रपती संभाजीनगर विमानतळ
कोणत्या बाबींची पडताळणी?
विमानतळावरील प्रवाशांच्या अनुभवांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी ग्राहक समाधान सर्वेक्षण करण्यात आले. विमानतळावरील सोयी-सुविधांसह विविध पैलूंचे मूल्यांकन करण्यासाठी या सर्वेक्षणात प्रवाशांकडून थेट अभिप्राय गोळा करण्यात आले. या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट ३३ प्रमुख पॅरामीटर्सवर विमानतळात सुधारणा करणे आहे. सर्वेक्षणानुसार, विमानतळावरून ये-जा करणारे प्रवासी स्वच्छता, पार्किंग, चेक-इन इ. सुविधांबद्दल समाधानी आहेत.