कारचालकामुळे अपघातात ऊसतोड मजूराने एक पाय गमावला; ३९ लाख भरपाई देण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 18:39 IST2025-11-15T18:38:20+5:302025-11-15T18:39:44+5:30
अर्जदार, पोलिस आणि वैद्यकीय पुराव्यावरून कारचालकाचा निष्काळजीपणा अपघातास कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

कारचालकामुळे अपघातात ऊसतोड मजूराने एक पाय गमावला; ३९ लाख भरपाई देण्याचे आदेश
छत्रपती संभाजीनगर : दुचाकी आणि कारच्या अपघातात एक पाय गमावलेला ऊसतोड कामगार प्रकाश मोहन राठोड (वय २४, रा. औराळा, ता. कन्नड) याला नुकसानभरपाई म्हणून ३८ लाख ९३ हजार १२२ रुपये ६ टक्के व्याजासह देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाचे सदस्य शौकत एस. गोरवाडे यांनी कारचालक आणि विमा कंपनीला दिला आहे.
अर्जदार, पोलिस आणि वैद्यकीय पुराव्यावरून कारचालकाचा निष्काळजीपणा अपघातास कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.
काय होती घटना ?
१६ डिसेंबर २०२१ रोजी प्रकाश राठोड दुचाकीने मुंबई-नागपूर हायवेवरून औराळा येथून संगमनेरकडे जात होता. त्याच्या विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या कारने रस्ता ओलांडून त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान प्रकाशचा उजवा पाय गुडघ्यापासून कापावा लागला. यामुळे तो ८० टक्के कायमस्वरुपी अपंग झाला. त्याचे भविष्यातील उत्पन्नही बंद झाले. म्हणून त्याने नुकसानभरपाई मिळण्यासाठी ॲड. एम.एम. परदेशी आणि मंगेश सरोदे यांच्यामार्फत मोटार अपघात न्यायाधिकरणात दावा दाखल केला होता. विमा कंपनीने सर्व मुद्दे नाकारले. अपघाताच्या वेळी कारचालकाकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता. तो पॉलिसीच्या अटीचा भंग आहे, असा युक्तिवाद केला.
सुनावणी व आदेश
न्यायाधिकरणाने सुनावणीदरम्यान ३ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. प्रकाश ‘अकुशल’ कामगार असल्यामुळे त्याचे मासिक उत्पन्न ११,६२५ रुपये गृहीत धरून त्याच्या नुकसानभरपाईची गणना केली. प्रकाशचा एक पाय कापल्यामुळे तो वैद्यकीयदृष्ट्या ८० टक्के अपंग झाला असला तरी काम करण्यासाठी तो १०० टक्के अपंग झाल्याचे गृहीत धरून न्यायाधिकरणाने वरीलप्रमाणे आदेश दिला.