घाटीच्या डॉक्टरांची अशीही माणुसकी

By Admin | Updated: September 10, 2014 00:52 IST2014-09-10T00:30:47+5:302014-09-10T00:52:49+5:30

बापू सोळुंके, औरंगाबाद अंगावर भिंत पडल्याने कमरेची हाडे तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाली. त्यामुळे घाटीत उपचारासाठी आलेल्या गरीब आदिवासी महिलेची अवस्था घाटीतील डॉक्टरांना पाहावली नाही.

Such humanity of the Valley doctors | घाटीच्या डॉक्टरांची अशीही माणुसकी

घाटीच्या डॉक्टरांची अशीही माणुसकी

बापू सोळुंके, औरंगाबाद
अंगावर भिंत पडल्याने कमरेची हाडे तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाली. त्यामुळे घाटीत उपचारासाठी आलेल्या गरीब आदिवासी महिलेची अवस्था घाटीतील डॉक्टरांना आणि समाजसेवा अधीक्षकांना पाहावली नाही. आॅर्थोपेडिक विभागाच्या डॉक्टरांनी स्वखर्चातून शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व साहित्य मिळविले. त्यानंतर एका दानशूर व्यक्तीने तिच्यावरील एमआरआयचा खर्च उचलल्याने तिच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, डॉक्टर तिला लवकरच डिस्चार्ज देणार आहेत.
रंजनाबाई गायकवाड (६०,रा. करगुड, ता. पारोळा, जि. जळगाव) असे शस्त्रक्रिया झालेल्या महिलेचे नाव आहे. जळगाव जिल्ह्यातील एका खेड्यात राहणाऱ्या आदिवासी समाजातील महिलेच्या अंगावर घराची भिंत कोसळली. त्यामुळे तिच्या कमरेची हाडे तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाली. तिच्या एकुलत्या एक मुलाने तिला धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रु ग्णालयात दाखल केले.
तेथे आठ दिवस ठेवल्यानंतरही तिच्यावर कोणतेही उपचार न करता डॉक्टरांनी तिला घाटीत घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार वृद्ध आईला घेऊन त्यांचा मुलगा घाटीत दाखल झाला. घाटीतील आॅर्थोपेडिक विभागप्रमुख डॉ. एम. बी. लिंगायत यांनी त्या महिलेला तपासले. तेव्हा ती असह्य वेदनेने त्रस्त होती. तिच्या कमरेची हाडे मोडल्याने तिला बसता व उभे राहता येत नव्हते.
शिवाय तिच्या दोन्ही पायांना सूज आली होती. तिच्यावर तातडीने शस्त्रक्रि या करणे आवश्यक आहे. त्याआधी तिची एमआरआय तपासणी करण्याचा सल्ला त्यांनी दिला. मात्र, त्या गरीब रुग्णाकडे एक वेळच्या जेवणाचेही पैसे नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. एमआरआय तपासणीसाठी शासकीय फीस म्हणून १ हजार ८०० रुपयांची त्यांना गरज होती. त्यानंतर त्यांनी ही बाब वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक नीलेश कोतकर यांना सांगितली. कोतकर यांनी लायन्स परिवारातील पदाधिकारी शैलेश कासलीवाल यांची भेट घेऊन गरजू महिलेला एमआरआय करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली.
त्यांनीही क्षणाचा विलंब न करता एमआरआयचा संपूर्ण खर्च उचलला. एमआरआय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आॅर्थोपेडिक विभागातील कनिष्ठ निवासी ते प्राध्यापक यांच्यापर्यंत सर्वांनी शस्त्रक्रियेसाठी लागणारे रॉड आणि सर्जिकल साहित्य, औषधी उपलब्ध केली. त्यानंतर तिच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. उपचारापुरता रुग्णांशी आपला संबंध असतो असा व्यवहार न ठेवता आॅर्थाेपेडिक विभागातील डॉक्टरांच्या चमूने स्वत: शस्त्रक्रियेचे साहित्य आणून महिलेवर शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी दाखविलेला माणुसकीचा पाझर हा सर्वांसाठी एक आदर्श आहे.

Web Title: Such humanity of the Valley doctors