छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी भडकलगेट इथे अभिवादनासाठी तात्पुरत्या स्वरूपात पुतळा बसविण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी पोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि मनपा प्रशासक जी.श्रीकांत यांनी संयुक्त पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेतला.
भडकलगेट येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी अलोट गर्दी होते. सध्या भडकलगेटवर पुतळा उभारणीचे काम सुरू आहे. अनुयायांनी अभिवादन कुठे करावे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मागील वर्षी विविध संघटनांनी या ठिकाणी अभिवादनासाठी तात्पुरता पुतळा ठेवला होता. यंदाही पुतळ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी विविध संघटनांकडून करण्यात येत होती. मंगळवारी सकाळी पोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि मनपा प्रशासक जी.श्रीकांत यांनी भडकलगेटची पाहणी केली. तात्पुरत्या स्वरूपात भडकलगेट येथे पुतळा ठेवण्याचा निर्णय या दोन्ही अधिकाऱ्यांनी घेतला. या ठिकाणी एक छोटे आणि मजबूत स्टेजही उभारले जाणार असून, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
पुतळ्यासोबत विकासाचे संकल्प चित्रवाहतूक बेट विकसित करण्यासाठी याच्याभोवती लाेखंडी पत्रे लावण्यात आले आहेत. या पत्र्यांवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे व वाहतूक बेटाच्या विकासाचे संकल्प चित्र लावण्यात येईल, असे पोलिस आयुक्तांनी यावेळी जाहीर केले. या पत्र्यावर कुणाही होर्डिंग लावू नये, असे आवाहन करण्यात आले.