सोयीऐवजी गैरसोयीच वाढल्या

By Admin | Updated: July 29, 2014 01:08 IST2014-07-29T00:26:03+5:302014-07-29T01:08:38+5:30

रेणापूर : येथील बसस्थानकात गैरसोयी वाढल्याने प्रवाशांचे हाल होत आहे़

Succesful increase in convenience rather than convenience | सोयीऐवजी गैरसोयीच वाढल्या

सोयीऐवजी गैरसोयीच वाढल्या

रेणापूर : येथील बसस्थानकात गैरसोयी वाढल्याने प्रवाशांचे हाल होत आहे़ प्रवाशांऐवजी मोकाट जनावरांचा वावर वाढला असून, घाणीच्या साम्राज्यामुळे दुर्गंधी पसरत आहे़ समस्यांच्या विळख्यातून बसस्थानकाची मुक्तता कधी होणार, असा सवाल होत आहे़
रेणापूर हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी बसस्थानक बांधण्यात आले़ या बसस्थानकाची विशेष देशभाल नसल्यामुळे प्रवाशांच्या सुविधाऐवजी गैरसोयीच जास्त वाढल्या आहेत़ या बसस्थानकातून दररोज परभणी विभागाच्या गाड्यांच्या दहा फेऱ्या, बीड विभागाच्या चार फेऱ्या तर लातूर आगाराच्या साठ ते सत्तर फेऱ्या होतात़ स्थानकातून अहमदपूर, खरोळा, पानगाव, धवेली , कारेपूर, किनगाव, गंगाखेड मार्गे परळी, पट्टी वडगाव आदी भागात गाड्या धावतात़ बसस्थानकामध्ये एकही बस मुक्कामी मुक्कामी राहत नाही़
रेणापूरपासून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या पिंपळ फाटा येथून परभणी, औरंगाबाद, जालना, जिंतूर, बीड, परळी, मानवत, हिंगोली, परतूर, माजलगाव, धारूर, नाशिक, शिर्डी आदी जलद गाड्या रेणापूर बसस्थानकात न येता व पिंपळ फाट्यावरही न थांबता तशाच पुढे जातात़ त्यामुळे लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची मोठी अडचण होत आहे़ या शहरांना जाण्यासाठी लातूरला अथवा अंबाजोगाईला जावे लागते़ ही गैरसोय टाळण्यासाठी पिंपळफाटा येथून धावणाऱ्या सर्व बसेस रेणापूर बस स्थानकातून जाव्यात, अशी मागणी तालुक्यातील प्रवाशांतून केली जात आहे़
बसस्थानक परिसरात काटेरी झाडे- झुडपे वाढल्यामुळे नजीकचे नागरिक काटेरी झुडपाचा आसरा घेऊन प्रात:र्विधी आटोपतात़ त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे़ स्थानकात ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्याने एस़टी़चालकाला स्थानकात येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते़ फाटकावर मोठ- मोठे खड्डे पडले असून त्याकडे महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे़ संरक्षक तारे, भिंतीचे कामही अर्धवट राहिले आहे़ या ठिकाणी दोन वाहतूक नियंत्रक असणे गरजेचे आहे़
(वार्ताहर)
फरशी उखडली; पाण्याची सोय नाही...
बसस्थानकामध्ये सध्या वीज, पाणी तर नाहीच़; शिवाय प्रवाशांसाठी लघुशंकागृह, शौचालय नाही़ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कॅन्टीन नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे़ बसस्थानकातील सर्व फरशी उखडली आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री अंधार असल्यामुळे प्रवाशांना बसस्थानकात थांबता येत नाही़ परिणामी पाळीव प्राण्यांचा वावर वाढला आहे़ बसस्थानकात एकही शिपाई अथवा पहारेकरी नाही़ वाहतूक नियंत्रकाला जीव मुठीत धरून दिवस काढावा लागतो़
बसस्थानकात प्रवाशांना सोयी मिळत नाहीत़ त्यासंदर्भात वरिष्ठांकडे माहिती देण्यात आली आहे़ आपण सकाळी ९ ते सायं़ ६ वा़पर्यंत काम पाहतो, अशी माहिती वाहतूक नियंत्रक पौळ यांनी दिली़

Web Title: Succesful increase in convenience rather than convenience