पूर परिस्थितीतही विद्यार्थी प्रवास करत केंद्रावर अन् एनवेळी परीक्षा रद्द; मेल पाठवले रात्री १२ वाजता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:21 IST2025-09-26T13:20:43+5:302025-09-26T13:21:48+5:30
परीक्षा गुरुवारी अन् रद्द केल्याचा मेल आला बुधवारी रात्री १२ वाजता;विद्यार्थ्यांचा संताप अनावर

पूर परिस्थितीतही विद्यार्थी प्रवास करत केंद्रावर अन् एनवेळी परीक्षा रद्द; मेल पाठवले रात्री १२ वाजता
छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे (डीएमइआर) सरळ सेवा भरतीची परीक्षा ऐनवेळी रद्द केल्याने पूर परिस्थितीशी सामना करत शेकडो किलोमीटरहून आलेल्या विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे विद्यार्थ्यांनी बुधवारी केंद्राबाहेर प्रचंड घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे गट ‘क’ तांत्रिक-अतांत्रिक कोट्यातील सरळसेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विविध पदासाठी गुरुवारी होणाऱ्या परीक्षेसाठी नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला अशा विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना शहरातील चिकलठाणा येथील केंद्र दिलेले होते. गुरुवारी सकाळी परीक्षा केंद्रावर विद्यार्थी पोहोचले. तेव्हा पूरपरिस्थितीचे कारण देत परीक्षा पुढे ढकलत असल्याची सूचना केंद्राबाहेर लावून ठेवली होती. ही सूचना पाहून विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.
मेल नर्सेस बचाव समितीतर्फे राज्य समन्वयक सम्यक जमधडे, सचिन खंदारे, दुर्गादास शिंदे आदींनी धाव घेत परीक्षार्थींची समस्या जाणून घेत प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी अमोल सरोदे, शेखर जगताप, सोहेल शेख, संभाजी आव्हाड, सुदाम आव्हाड, सिद्धार्थ गायकवाड, सचिन चिंचोले, पवन शिंदे, दिनेश जाधव, सोमनाथ कावळे, राम वाघ, जिलानी पठाण, संतोष सांगळे, तन्वीर अहमद, नानासाहेब मुळे, सुमित लोखंडे, अनिकेत राऊत, नवनाथ गायके, राहुल सरोदे, कृष्णा काटकर, हेमंत पाटील, सिद्धांत शेंडे, सागर व्यवहारे, चंद्रकांत पवार आदींची उपस्थिती होती.
रात्री १२ वाजेच्या सुमारास ई-मेल
सध्या महाराष्ट्रात साधारण महिनाभरापासून प्रचंड पाऊस आणि पूरपरिस्थिती आहे. या परिस्थितीमुळे आठ-दहा दिवस अगोदर परीक्षा पुढे ढकलत असल्याचे जाहीर करता आले असते. मात्र, असे न करता बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांना ई-मेल पाठवले. मात्र, तोपर्यंत अनेक विद्यार्थीछत्रपती संभाजीनगरच्या प्रवासाला निघाले होते. अनेक विद्यार्थी एक दिवस अगोदर येऊन शहरात थांबलेले होते, असे सम्यक जमधडे यांनी सांगितले.