रस्ता रुंदीकरण मोहिमेस आंबेडकरनगरात जोरदार विरोध; मागण्या मान्य होताच कारवाई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:43 IST2025-07-09T15:41:29+5:302025-07-09T15:43:18+5:30
बाधित मालमत्ताधारकांचे पंतप्रधान आवास योजनेत पुनर्वसन करणार

रस्ता रुंदीकरण मोहिमेस आंबेडकरनगरात जोरदार विरोध; मागण्या मान्य होताच कारवाई!
छत्रपती संभाजीनगर : रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत महापालिका, पोलिसांचे पथक मंगळवारी दुपारी २:३० वाजता जळगाव रोडवर आंबेडकरनगरात दाखल झाले. या पथकाला महिला, पुरुष, तरुण आणि काही राजकीय नेत्यांनी कडाडून विरोध केला. बाधित मालमत्ताधारकांचे पुनर्वसन, बुद्ध विहार, विहारासमोरील कमान बांधून देण्याचे आश्वासन मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले. त्यानंतर तणाव निवळला. त्यानंतर सायंकाळी ५:०० वाजता या भागात कारवाईला हळुवार सुरुवात झाली. बाधित व्यावसायिक मालमत्ता ७:०० वाजेपर्यंत पाडण्यात आल्या.
जळगाव रोड ६० मीटर (२०० फूट) रुंद आहे. त्यादृष्टीने नगररचना विभागाने मार्किंग केली होती. बहुतांश मालमत्ताधारकांनी बाधित भागातील सामान काढून घेतले होते. मंगळवारी सकाळी ११:३० वाजता हर्सूल टी पॉईंट येथून कारवाईला सुरुवात झाली. पथक दुपारी २:३० वाजता आंबेडकरनगर चौकात दाखल झाले. प्रारंभी मार्किंग चुकीची असल्याचा आरोप झाला. मनपाने परत एकदा मार्किंग केली. हजारो नागरिकांची येथे गर्दी जमली होती. महिला, पुरुषांनी कारवाईला विरोध केला. माजी नगरसेवक अमित भुईगळ, अरुण बोर्डे यांनीही मनपा अधिकाऱ्यांकडे पुनर्वसन, विहार, विहारासमोरील कमान बांधून देण्याची मागणी केली. हळूहळू तणाव वाढत गेला. पोलिसांचे विशेष पथकही या भागात सक्रिय झाले. ड्रोनद्वारे संपूर्ण घटनेचे चित्रीकरण सुरू झाले. बघ्याची गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच मनपा प्रशासक जी. श्रीकांत घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर लगेच पोलिस आयुक्त प्रवीण पवारही आले. त्यांनी राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांसोबत संवाद साधला. त्यानंतर तणाव निवळला.
आणीबाणी कायद्याचा वापर
मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी आंबेडकरनगरातील बुद्ध विहाराचा भाग, प्रवेशद्वार नव्याने बांधून देण्याचे आश्वासन दिले. आणीबाणी कायद्यानुसार (६७-३ सी) हे काम विनानिविदा करण्यात येईल, असे जाहीर केले. रस्त्यात बाधित होणाऱ्यांचे पंतप्रधान आवास योजनेत पुनर्वसन करण्यात येईल, मोहीम थांबणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
एका जेसीबीने कारवाई
सायंकाळी ५:०० वाजता आंबेडकरनगर चौकात एका मालमत्तेला जेसीबी लावण्यात आला. ही मालमत्ता संथ गतीने पाडण्याचे काम सुरू होते. नंतर वेग वाढविण्यात आला. व्यावसायिक मालमत्ताच पाडण्यात आल्या. निवासी मालमत्तांना १५ ऑगस्टपर्यंत मुभा दिलेली आहे. काळा गणपती मंदिरापर्यंत कारवाई करण्यात आली.