छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 19:39 IST2025-06-11T19:23:48+5:302025-06-11T19:39:23+5:30

या अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांचा सर्वात मोठा फटका सिद्धार्थ गार्डन परिसराला बसला.

Storm hits Chhatrapati Sambhajinagar; Two killed as Siddharth Garden gate collapses | छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर: शहरात आज (११ जून) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यांनी थैमान घातले. काही मिनिटांतच शहराच्या अनेक भागांत झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. विजेच्या तारांवर व झाडांवर झालेल्या परिणामामुळे अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. तर सिद्धार्थ गार्डनच्या गेटवरील डोमच्या जवळची भिंत कोसळून दोन पर्यटक महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

वादळी वाऱ्यामुळे शहरात एकच गोंधळ उडून जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते. या अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांचा सर्वात मोठा फटका सिद्धार्थ गार्डन परिसराला बसला. वादळी वारा सुरू झाल्याने गार्डनमधून पर्यटक बाहेर पडत होते. याच वेळी मुख्य गेटच्या वर असलेल्या डोमजवळील भिंत वाऱ्याच्या तडाख्याने अचानक कोसळली. या दुर्घटनेत तिघेजण मलब्याखाली अडकले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी व स्थानिक प्रशासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच दोन महिलांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. एक पुरुष गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अशी आहेत मृतांची नावे
स्वाती अमोल खैरनार ( ३७, रा. धामणगाव, तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव, ह. मू. रांजणगाव शेनपुंजी, वाळूज ) आणि रेखा हरिभाऊ गायकवाड ( ६५, गजानन नगर, टीव्ही सेंटर, हडको) अशी मृतांची नावे आहेत. तर शेख अखिल आणि एक गंभीर जखमी आहेत. दरम्यान, चार लहान मुले देखील यावेळी किरकोळ जखमी झाल्याची माहिती असून ते पालकांच्या सोबत गेले. 

Web Title: Storm hits Chhatrapati Sambhajinagar; Two killed as Siddharth Garden gate collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.