मराठी भाषिकांवरील अत्याचार थांबवा

By Admin | Updated: July 31, 2014 00:45 IST2014-07-31T00:23:48+5:302014-07-31T00:45:14+5:30

उस्मानाबाद : कर्नाटकातील मराठी भाषिकांची मुस्कटदाबी करणाऱ्या कर्नाटक सरकार तसेच तेथील कर्नाटक रक्षण वेदिका या संघटनेचा उस्मानाबाद शहर काँग्रेस तसेच राष्ट्रवादी युवती काँग्रेसने निषेध केला आहे.

Stop the atrocities against Marathi speakers | मराठी भाषिकांवरील अत्याचार थांबवा

मराठी भाषिकांवरील अत्याचार थांबवा

उस्मानाबाद : कर्नाटकातील मराठी भाषिकांची मुस्कटदाबी करणाऱ्या कर्नाटक सरकार तसेच तेथील कर्नाटक रक्षण वेदिका या संघटनेचा उस्मानाबाद शहर काँग्रेस तसेच राष्ट्रवादी युवती काँग्रेसने निषेध केला आहे. यासंदर्भात दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सदर संघटनेवर तातडीने बंदी घालण्याची मागणी केली आहे.
उस्मानाबाद शहर काँग्रेस कमिटीचे समियोद्दीन मशायक, सुजित बनसोडे, श्रीकांत भुतेकर, बालाजी साळुंके, धनंजय राऊत, गोरोबा झेंडे, नितीन शेरखाने, गणेश सापते, अभिजित शेरखाने, सिद्धार्थ बनसोडे, सतीश लोंढे, उमेश राजेनिंबाळकर, अशोक मगर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. कर्नाटकात मराठी भाषिकांची गळचेपी केली जात असून, कर्नाटक राज्यशासनही अशा प्रवृत्तीला खतपाणी घालीत असल्याचा आरोप यावेळी या पदाधिकाऱ्यांनी केला. सीमा भागातील मराठी भाषिकांना सन्मानाने पुन्हा महाराष्ट्रात सामावून घ्यावे व मराठी भाषिकांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक रक्षण वेदिका या संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
दरम्यान राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सक्षणा सलगर, अनुराधा थोरात, अपर्णा वाकुरे, भाग्यश्री शेळके आदींनीही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कर्नाटकात मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाचा निषेध केला आहे. शासनाने या प्रकरणी योग्य तोडगा काढावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Stop the atrocities against Marathi speakers