सावत्र बापाचा विकृतपणा; मुलीवर अत्याचार करून चित्रीकरण, ब्लॅकमेलिंग करून पुन्हा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 13:16 IST2025-05-27T13:16:20+5:302025-05-27T13:16:50+5:30
अखेर संतप्त मुलीने चिकलठाणा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी विकृत सावत्र बापाला अटक केली.

सावत्र बापाचा विकृतपणा; मुलीवर अत्याचार करून चित्रीकरण, ब्लॅकमेलिंग करून पुन्हा प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर : आई आजारी असल्याचे सांगून ४३ वर्षीय विकृत सावत्र बापाने १९ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून तिला ब्लॅकमेल करत पुन्हा अत्याचाराचा प्रयत्न केला. अखेर संतप्त मुलीने चिकलठाणा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी विकृत सावत्र बापाला अटक केली.
१९ वर्षीय राही (नाव बदलले आहे) खासगी नोकरी करून महाविद्यालयीन शिक्षणही घेते. कौटुंबिक वादातून तिच्या आईने तिच्या वडिलांपासून काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला होता. राहीची आई एका रुग्णालयात नोकरी करत होती. त्याच रुग्णालयात काम करणाऱ्या ४३ वर्षीय पुरुषाशी तिने दुसरे लग्न केले. लग्नानंतर राही व तिची बहीण यांनाही त्याने स्वीकारले. काही काळानंतर राहीच्या आईला त्या इसमापासून एक मुलगीही झाली. सर्वजण बीड बायपास परिसरात राहतात. काही दिवसांपासून राहीच्या आईची प्रकृती खराब असल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. २२ एप्रिलला मध्यरात्री २:३० वाजता राही तिच्या बहिणींसह वेगळ्या खोलीत झोपलेली असताना बापाने त्यांच्या खोलीचा दरवाजा वाजवला. ‘तुझ्या आईची तब्येत बिघडली आहे’ असे सांगून त्याने राहीला बाहेर बोलावले. राही हॉलमध्ये आली असता बापाने तिच्यावर अत्याचार केला. त्याचे त्याने मोबाईलमध्ये चित्रीकरणही केले. आई आजारी असल्याने आणि कुटुंबाची बदनामी होईल, या भीतीने राहीने ही बाब कोणालाही सांगितली नाही.
ब्लॅकमेलिंग करून पुन्हा प्रयत्न
आरोपी वडिलांनी मोबाईलमधील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करत अत्याचाराचे प्रयत्न केले. त्याच्या त्रासाला कंटाळून राहीने थेट चिकलठाणा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. तिच्या तक्रारीनंतर पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी विकृत बापावर गुन्हा दाखल करून अटक केली. उपनिरीक्षक उत्तम नागरगोजे अधिक तपास करत आहेत.