एकाच हॉटेलमध्ये मुक्काम, पण शिंदे-फडणवीसांची भेट नाही; दोघेही म्हणाले, 'आम्ही...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 13:22 IST2025-12-01T13:21:52+5:302025-12-01T13:22:34+5:30
महायुतीच्या सर्वोच्च नेत्यांनी एकमेकांना का टाळले?

एकाच हॉटेलमध्ये मुक्काम, पण शिंदे-फडणवीसांची भेट नाही; दोघेही म्हणाले, 'आम्ही...'
छत्रपती संभाजीनगर: राज्याच्या राजकारणात 'महायुती'तील दोन घटक पक्ष भाजप आणि शिंदेसेना यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. शहरात प्रचार दौऱ्यानिमित्त आलेले राज्याचे दोन्ही सर्वोच्च नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हे रविवारी रात्री शहरातील एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी होते. मात्र, एकाच छताखाली असूनही या दोन प्रमुख नेत्यांनी एकमेकांशी भेटणे किंवा बोलणे पूर्णपणे टाळले!
महायुतीतील मित्रपक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला आहे. शिंदे गटातील अनेक नेत्यांना भाजप प्रवेश देत असून दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर निशाणा साधत आहेत. आमदार संतोष बांगर आणि भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्यातील टोकाच्या वाक् युद्धानंतर, बांगर यांच्या घरावर पोलिसांचा छापा पडला. तर आमदार नीलेश राणे यांच्यावर भाजप नेत्यांच्या घरी पैसे सापडल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला. आता शहाजीबापू पाटील यांच्या घरावर देखील पोलिसांचा छापा पडला आहे. या घटनाक्रमामुळे शिंदे गटात आधीच अस्वस्थता आहे. याच पार्श्वभूमीवर, या दोन नेत्यांच्या 'नॉन-मीटिंग'ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस
पत्रकारांनी दोन्ही नेत्यांची भेट न झाल्याबद्दल विचारले असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारण दिले, "मी रात्री उशिरा आलो, तसेच आता सकाळी लवकर प्रचार दौऱ्याला निघायचे असल्याने, मी त्यांना भेटललो नाही. मात्र, आम्ही फोनवर बोलतो."
उपमुख्यमंत्री शिंदेंची री
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याचीच री ओढली. "आम्ही दोघेही प्रचाराच्या लगबगीमध्ये आहोत, पण आम्ही फोनवर एकमेकांच्या संपर्कात असतो," असे त्यांनी स्पष्ट केले.
शिंदे गटाची वाढती अस्वस्थता
शिंदे गटाचे नेते भाजपमध्ये दाखल होत असताना, तसेच आमदार बांगर, नीलेश राणे आणि शहाजीबापूंसारख्या आमदारांवर पोलीस कारवाईचे संकेत मिळत असताना, या दोन नेत्यांनी एकमेकांना भेटणे टाळल्यामुळे शिंदे गट अधिकच अस्वस्थ झाला आहे. महायुतीतील नेतृत्वाच्या संबंधात सर्व काही 'आलबेल' नसून, दोन्ही नेत्यांमध्ये 'शीतयुद्ध' सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.