भोकरकडे असणार राज्याचे लक्ष
By Admin | Updated: June 11, 2014 00:23 IST2014-06-10T23:52:20+5:302014-06-11T00:23:38+5:30
मोदी : लाटेतही मतदारांनी कॉंग्रेसला दिले मताधिक्य

भोकरकडे असणार राज्याचे लक्ष
विठ्ठल फुलारी, भोकर आता विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु झाली असून अनेकजण आमदार होण्याची स्वप्ने पाहत आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला़ तरीही सर्वपक्षीय विरोधक आरोप-प्रत्यारोपाचा धुराडा उडवत आव्हान देण्याचा प्रयत्न करतील़ परंतु मोदी लाटेच्या चर्चेतही काँग्रेसला मताधिक्य मिळवून देणाऱ्या या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष असणार आहे़ गत पाच वर्षांपूर्वी भोकर विधानसभा मतदारसंघ उमरी, धर्माबाद तालुक्यापासून तोडून मुदखेड व अर्धापूर तालुक्यांशी जोडला गेला. यामुळे या मतदारसंघाचे नेतृत्व अशोकराव चव्हाण यांच्याकडे आले. मुख्यमंत्री राहिलेल्या अशोकराव चव्हाण यांना मतदारांनी पसंती देत भरघोस मते दिली. त्यानंतर चव्हाण यांनी अनेक विकासकामे करत वाडी-तांड्यांवरील जनसामान्यांशी नाते जोडले. खरे तर भोकर मतदारसंघ हा दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्यापासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला. उर्ध्व पैनगंगेच्या पाण्याने मुदखेड, अर्धापूर तालुका व भोकर मतदारसंघातील भोसीचा परिसर हिरवागार झाला. याचे श्रेय दिवंगत शंकरराव चव्हाण यांना जाते, याबाबत कोणाचेही दुमत नाही. त्यानंतर खा. अशोकराव चव्हाण भोकर मतदारसंघाचे नेतृत्व करीत असताना सिंचनाकडे जास्त लक्ष दिले. यामुळे चव्हाण कुटुंबियांना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे. यात बजुर्गापासून युवकांचाही मोठा गट आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेला दूर सारत अशोकराव चव्हाण काँग्रसकडून खासदार झाले. आता भोकर विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. काँग्रेस पक्षाकडून खा. चव्हाण यांच्या पत्नी अमिताताई चव्हाण यांचे नाव निश्चित मानले जाते. अमिताताई चव्हाण यांनी गत पाच वर्षांत ग्रामीण भागात दौरे केले. तेथील समस्यांबाबत चर्चा केली. अतिदुर्गम असलेल्या वाडी-तांड्यांवरही त्या रमल्या व त्यांनी महिलांशी हितगुज केले. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून अमिताताई चव्हाण उमेदवार असाव्यात, असा सूर मतदारसंघातून उमटतो़ मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले डॉ. माधवराव किन्हाळकर यांनीही या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु केली आहे. सध्या कोणत्याही पक्षात नसलेले किन्हाळकर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपातील नेतृत्वाशी संपर्कात असल्याचे बोलले जाते़ पण हा विधानसभा मतदारसंघ पूर्वीपासूनच शिवसेनेला सुटला असल्याने यावेळी तो शिवसेनेकडे जातो की भाजपाकडे राहतो यावर पुढील गणित अवलंबून आहे़ लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीत सामील झालेले शेतकरी संघटनेतील प्रल्हाद इंगोले हे भोकर विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटनेकडून उतरण्यास इच्छुक आहेत. शिवसेनेकडून भोकरचे डॉ. उत्तम जाधव, बबन बारसे यांच्या नावाची चर्चा आहे. डॉ. उत्तम जाधव हे यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कमी मतांनी पराभूत झाले होते. बंजारा समाजात त्यांचे वेगळे स्थान आहे.