एस.टी. महामंडळाला एसटीपीचे पाणी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:59 IST2019-05-06T22:59:27+5:302019-05-06T22:59:58+5:30
औरंगाबाद : एस.टी. महामंडळाला दररोज मनपाकडून १ लाख लिटर पाणी देण्यात येत आहे. या शुद्ध पिण्यायोग्य पाण्याचा वापर महामंडळ ...

एस.टी. महामंडळाला एसटीपीचे पाणी देणार
औरंगाबाद : एस.टी. महामंडळाला दररोज मनपाकडून १ लाख लिटर पाणी देण्यात येत आहे. या शुद्ध पिण्यायोग्य पाण्याचा वापर महामंडळ बस धुण्यासाठी करीत असल्याचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’ने प्रकाशित केले. या वृत्तामुळे मनपात एकच खळबळ उडाली. महापौरांनी तातडीची बैठक बोलावून एस.टी. महामंडळाला एसटीपी प्लँटमधील प्रक्रिया केलेले पाणी बस धुण्यासाठी द्यावे, अशी सूचना महापौरांनी केली.
मागील दीड महिन्यापासून शहरातील एक ते दोन एमएलडी पाणी वाचविण्यासाठी मनपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शहरातील आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन मनपाने एमआयडीसीच्या पाण्याची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. पाण्यासाठी नागरिक त्रस्त आहेत. अनेक वसाहतींना आठ ते दहा दिवसांनंतर पाणी मिळत आहे. एस.टी. महामंडळ पैसे देऊन मनपाकडून पाणी बस धुण्यासाठी घेत असेल तर ते चुकीचे आहे. उपअभियंता ए.बी. देशमुख यांनी याची चौकशी करावी, एस.टी. महामंडळाला एसटीपीचे पाणी देण्यासाठी योग्य पावले उचलावीत, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.
जीपीएस तपासण्यात यावे
शहराच्या चार वेगवेगळ्या भागातून टँकर भरण्यात येतात. १७०० रुपयांमध्ये एका टँकरची काळ्याबाजारात विक्री सुरू असल्याचा आरोप दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांसमोर लावला होता. या आरोपाचे आज पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी खंडण केले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी टँकरची जीपीएस यंत्रणा तपासण्याची सूचना केली. टँकर कोणाला दिले त्यांचे पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक रजिस्टरमध्ये नोंद करावा, असेही त्यांनी नमूद केले.
टँकर कोणत्या भागात जातात, ते कोणी मागविले, याच्या निव्वळ ढोबळ नोंदी आहेत. याकडे महापौरांनी लक्ष वेधले असता अधिकाऱ्यांनी टँकर वितरणात अनियमितता नसल्याचा दावा केला. महापौरांनी जीपीएस तंत्राद्वारे टँकरची तपासणी करावी. एका अधिकाºयाकडे जबाबदारी द्यावी, असे सांगितले. चिकलठाणा एमआयडीसीतील एन-१ सकाळी ६ वाजेपासून टँकर भरण्यास सुरुवात करावी. एमआयडीसीचे पाणी पिण्यायोग्य असल्याचे नागरिकांनाही सांगण्यात येणार असल्याचे महापौरांनी नमूद केले.