एस.टी. बस, रेल्वे ‘हाऊसफुल्ल’; जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 17:34 IST2021-11-03T17:32:19+5:302021-11-03T17:34:24+5:30

रेल्वेचा प्रवास वेटिंगवर असून सिडको, मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची गर्दी

S.T. Bus, railway ‘housefull’; Passenger exercise to get a seat | एस.टी. बस, रेल्वे ‘हाऊसफुल्ल’; जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची कसरत

एस.टी. बस, रेल्वे ‘हाऊसफुल्ल’; जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची कसरत

औरंगाबाद : दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी होत आहे. रेल्वे, बस येत नाही तोच अवघ्या काही वेळेत त्या भरूनही जात आहेत. त्यामुळे जागा मिळविण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते आहे.

प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन एस.टी. महामंडळातर्फे दररोज जादा बस सोडण्यात येत आहेत. मध्यवर्ती बसस्थानकाच्या तुलनेत सिडको बसस्थानकात प्रवाशांची अधिक गर्दी पाहायला मिळते आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी बसस्थानकात तळ ठोकून असून गर्दीनुसार बस सोडण्यावर भर दिला जात आहे. परंतु अनेक मार्गांसाठी बस वेळेवर येत नसल्यामुळे प्रवाशांना बराच वेळ ताटकळत राहावे लागत आहे. काही बस या फलाटावर उभ्या राहत नाहीत. बसची शोधाशोध करण्याची वेळ प्रवाशांवर येते आहे. प्रवाशांच्या गर्दीनुसार बसस्थानकातून जादा बस सोडण्यात येत आहेत, अशी माहिती एस.टी. महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी अमोल अहिरे यांनी दिली.

परभणी, नांदेड, मुंबई, नाशिक, हैदराबाद आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेला प्राधान्य दिले जात आहे. सचखंड एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेसह बहुतांश रेल्वेत प्रवाशांची चांगलीच गर्दी होत आहे. जागा मिळविण्यासाठी प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीमुळे वेटिंग तिकिटांवरच प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे.

जनरल तिकिटांअभावी गैरसोय
प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असलेल्या नंदीग्राम, तपोवन, देवगिरी, राज्यराणी, मराठवाडा एक्स्प्रेसला जनरल तिकिटाची सुविधा नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. केवळ दक्षिण भारतातील प्रवाशांसाठी धावणाऱ्या रेल्वेत जनरल तिकीट देण्यात आले. त्याविषयी संताप व्यक्त होत आहे.

एजंट सक्रिय, ‘एस.टी.’चे दुर्लक्ष
गर्दीचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांचे एजंट मध्यवर्ती बसस्थानकात सक्रिय झाले आहेत. प्रवाशांच्या मागे लागून विविध ठिकाणी जाण्यासंदर्भात विचारणा करणारे एजंट सर्रास दिसत आहेत. त्याकडे एस.टी. महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: S.T. Bus, railway ‘housefull’; Passenger exercise to get a seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.