ssc exam: यंदा सातवी, आठवीच्या सहभागावरून मिळणार दहावीचे क्रीडा गुण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 19:44 IST2022-02-24T19:41:42+5:302022-02-24T19:44:11+5:30
ssc exam: शिक्षणमंत्र्यांचे निर्देश -राज्य मंडळाच्या निर्णयाकडे खेळाडूंचे लक्ष

ssc exam: यंदा सातवी, आठवीच्या सहभागावरून मिळणार दहावीचे क्रीडा गुण !
- योगेश पायघन
औरंगाबाद: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. बारावीच्या विद्यार्थ्यांना नववी व दहावीमधील तर दहावीच्या विद्यार्थ्यांना सातवी आठवीतील क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन २०२१-२२ या परीक्षेत सवलतीचे क्रीडा गुण देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत तर राज्य मंडळ यासंबंधी काय निर्णय घेते याकडे खेळाडूंचे लक्ष लागले आहे.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणावर परिणाम झाला तर या काळात क्रीडा स्पर्धाही झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यावर्षी प्रचलित पद्धतीने परीक्षा होत असून त्यात सवलतीसाठी १५ जानेवारीपर्यंत क्रीडा गुणांचे प्रस्ताव क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत विभागीय मंडळात सादर करण्याच्या सूचना राज्य मंडळाने दिल्या होत्या तर शिक्षणमंत्र्यांच्या निर्देशानुसार विभागीय मंडळांना अद्याप नव्याने काय सूचना येतात, याकडे खेळाडू विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहेत तर या निर्णयाबद्दल क्रीडाक्षेत्रात विविध मतांतरेही व्यक्त होत आहे.
दहावी परीक्षेला बसलेले विद्यार्थी -६४,६२२
बारावी परीक्षेला बसलेले विद्यार्थी -५८,३४७
दहावीच्या क्रीडा गुणासाठी काय निकष?
दहावी परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता सातवी व इयत्ता आठवीमध्ये सदर विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येऊन त्यांना सन २०२१-२२या वर्षाकरिता सवलतीचे क्रीडा गुण देण्याचे परीक्षा मंडळाला शिक्षणमंत्र्यांनी निर्देश दिले.
बारावीच्या क्रीडा गुणासाठी काय निकष?
बारावी परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन सन २०२१-२२ करीता सवलतीचे क्रीडा गुण देण्याचे परीक्षा मंडळाला शिक्षणमंत्र्यांनी निर्देश दिले.
यंदासाठीच ही सवलत
कोरोनामुळे क्रीडा स्पर्धा होऊ न शकल्याने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागील इयत्तेतील सहभावरून क्रीडा गुणांचा लाभ देण्याबाबत शिक्षणमंत्र्यांनी निर्देश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना दिले. केवळ यावर्षीच्या परीक्षेकरताच ही सवलत देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
क्रीडा गुणांसाठी १५ जानेवारीपर्यंत मुदत होती. मात्र, ३० जानेवारीपर्यंत काही प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत सादर झाले ते स्वीकारले. अद्याप नव्या सूचना राज्य मंडळाकडून मिळाल्या नाहीत. क्रीडा गुणांसदर्भात राज्य मंडळाकडून क्रीडा गुणांसदर्भात सूचना मिळाल्यावर त्यानुसार अंमलबजावणी होईल.
-आर. पी. पाटील, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, औरंगाबाद