झाडाखाली घुमतात कष्टकऱ्यांच्या मुलांचे ‘अ, ब, क, ड’चे स्वर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:04 IST2021-04-04T04:04:42+5:302021-04-04T04:04:42+5:30
औरंगाबाद: कोरोना महामारीने सर्वत्र लॉकडाऊन झाले अन् शाळा बंद केल्याने शिक्षणावर गंडांतर आले. सुविधा असणारी मुले ऑनलाइन शिक्षण घेत ...

झाडाखाली घुमतात कष्टकऱ्यांच्या मुलांचे ‘अ, ब, क, ड’चे स्वर...
औरंगाबाद: कोरोना महामारीने सर्वत्र लॉकडाऊन झाले अन् शाळा बंद केल्याने शिक्षणावर गंडांतर आले. सुविधा असणारी मुले ऑनलाइन शिक्षण घेत असताना कष्टकरी व हातावर पोट असलेल्या मजुरांच्या मुलांचे शिक्षण मात्र संपले होते. त्यांना शिकविण्याचा वसा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने घेतला आहे.
शाळा नसल्याने पाटी-पुस्तक घरात कोपऱ्यात टाकून देत ही चिमुरडी उणाड फिरत होती. शक्ती नगरात सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे सोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे भगवान हिंमतराव सदावर्ते (रा. बुलडाणा) यांनी त्या मुलांना एकत्र केले. पहिली ते ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोकळ्या जागेत झाडाखाली मोफत शिकवणी वर्ग सुरू केले. त्यात मुलंही रमली. मुलांना शिक्षणाचा व भगवान यांना मुलांचा लळा लागला. दिवसभरात अभ्यासातून एखाद दुसरा तास या कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी राखीव ठेवत त्यांना शिकविण्याचे काम ते नित्यनेमाने करू लागले.
लहान मुलांना मोबाइल देण्यास पालकांचा विरोध असला तरी ऑनलाइन शिकवणीसाठी नाइलाजाने पालकांनी तो घेऊन दिला; परंतु मजूर व कष्टकऱ्यांना जगण्याची भ्रांत ते काय मोबाइल घेणार? आधिच पोटाला चिमटे घेत जीवनाचा गाडा हाकणारी ही मंडळी. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मुलांच्या शिक्षणाचे वांधे झाले होते. भगवान यांनी दररोज या मुलांना शिकवणी सुरू केली, त्यामुळे पालकांचे चेहरेही आनंदले.
भगवान यांनी सांगितले, आपण शिक्षण घेत असताना स्वत:सह दुसऱ्यांनाही त्याचा फायदा झाला पाहिजे, आर्थिक परिस्थितीअभावी योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने मुलांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्या मुलांच्या पालकांना बोलून शिकवणीसाठी मी मदत करतो. तुम्ही फक्त मुलांना मास्क लावून पाटी, पुस्तक घेऊन पाठवा, असे त्यांना सांगितले. तत्काळ पालकांनी हमी भरली आणि मुलांचे चेहरेदेखील हास्याने फुलले. कोरोनाचे नियम पाळून ज्ञानदान केले जात आहे.
लॉकडाऊनची १२ महिने उलटून गेली आणि पुन्हा तीच परिस्थिती आली. शाळा बंद आणि ऑनलाइन शिक्षणामुळे पाल्यासह पालक नाराज झाले होते; परंतु आता शिकवणीमुळे ते ‘अ,ब,क,ड’ सह पाढे गिरवू लागले.
कॅप्शन... लॉकडाऊनमध्ये शाळा नाही, मग कष्टकऱ्यांच्या मुलांना सुरू केली स्पर्धा परीक्षार्थीने मोफत शिकवणी.