काही रेल्वे रद्द, काहींचे मार्ग बदलले; ऐन गणेशोत्सवात रेल्वेचे ‘रडगाणे’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 20:05 IST2025-09-03T20:04:43+5:302025-09-03T20:05:11+5:30
ऐन गणेशोत्सवात प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

काही रेल्वे रद्द, काहींचे मार्ग बदलले; ऐन गणेशोत्सवात रेल्वेचे ‘रडगाणे’
छत्रपती संभाजीनगर : हैदराबाद विभागातील पावसामुळे गत आठवडाभर रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. त्यानंतर आता भुसावळ विभागातील लाइन ब्लाॅकमुळे काही रेल्वेंच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. तर काही रेल्वे अंशत:, तर काही पूर्ण रद्द केल्या आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
निझामाबाद येथून ३ सप्टेंबर रोजी सुटणारी निझामाबाद - पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. त्याबरोबरच रेक उपलब्ध नसल्यामुळे जालना - नगरसोल आणि नगरसोल - जालना (७७६२१ व ७७६२२), नगरसोल - नांदेड (०७२८२) रेल्वेदेखील बुधवारी रद्द करण्यात आल्या आहेत.
भुसावळ विभागातील लाइन ब्लाॅकमुळे निझामाबाद - पुणे एक्स्प्रेस ६ सप्टेंबर रोजी पूर्णा, परभणी, परळी, लातूर रोड, कुरुडूवाडी, दौंडमार्गे धावणार आहे. रामेश्वर ओखा एक्स्प्रेस ५ सप्टेंबर रोजी पूर्णा, हिंगोली, अकोला, भुसावळ, जळगाव, पलधीमार्गे धावेल. नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस ७ सप्टेंबर पूर्णा, हिंगोली, अकोला, भुसावळ, खंडावामार्गे धावणार आहे, तर याच दिवशी मुंबईहून येणारी आणि जाणारी तपोवन एक्स्प्रेस पूर्णा, परभणी, परळी, लातूर रोड, कुरुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याणमार्गे ये-जा करेल.
जनशताब्दी धावणार नगरसोलपर्यंतच
हिंगोली - मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस ७ सप्टेंबर रोजी नगरसोलपर्यंतच धावणार आहे. ही रेल्वे नगरसोल ते मुंबईदरम्यान रद्द करण्यात आली आहे. याच दिवशी धावणारी मराठवाडा एक्स्प्रेस ही धर्माबाद ते छत्रपती संभाजीनगर अशी धावेल. ही रेल्वे छत्रपती संभाजीनगर ते मनमाडदरम्यान रद्द करण्यात आली आहे, तर ६ सप्टेंबर रोजी अजिंठा एक्स्प्रेस ही काचिगुडाहून नगरसोलपर्यंतच धावेल.