छत्रपती संभाजीनगरात स्क्रॅपच्या आडून सव्वाकोटी रुपयांच्या ‘एमडी’ ड्रगची तस्करी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:52 IST2025-06-25T12:52:08+5:302025-06-25T12:52:33+5:30
या प्रकरणी कंपनी मालकासह दोन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

छत्रपती संभाजीनगरात स्क्रॅपच्या आडून सव्वाकोटी रुपयांच्या ‘एमडी’ ड्रगची तस्करी
छत्रपती संभाजीनगर : साजापूर गावाच्या चौफुलीवर अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाकडून (एनडीपीएस) दोन ट्रकमधून वाहतूक करण्यात येत असलेले १ कोटी २३ लाख ६५ हजार रुपये किमतीचे एमडी (मेफेड्रॉन पावडर) जप्त करण्यात आले होते. या जप्त पावडरची तपासणी शासकीय प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर तीन आरोपींविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती एमडीपीएसच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.
आरोपींमध्ये ट्रक चालक सफीकुर रहेमान तफज्जुल हुसेन (रा. तिरथ, उत्तर प्रदेश), राज रामतिरथ अजुरे (रा.तिरथ) आणि स्क्रॅपचा मालक बबन खान (रा. साजापूर) यांचा समावेश आहे. एनडीपीएसच्या पाेलिस निरीक्षक गीता बागवडे, सहायक पाेलिस निरीक्षक मनाेज शिंदे, उपनिरीक्षक अमाेल म्हस्के यांच्या पथकाने साजापूर चाैफुली परिसरात शनिवारी आयशर ट्रक एमएच ०४ बीयु ५१६० आणि एमएच ०४ ईवाय ९९७७ थांबवून जप्त केले हाेते. या वाहनांमध्ये स्क्रॅपच्या मालामध्ये पांढरे पावडरसदृश रसायन व द्रव असलेले रसायन हाेते. त्याच वेळी सोमवारी पथकास मिळालेल्या माहितीनुसार साजापूर परिसरातील गाेडाऊन येथे छापा मारल्यानंतर त्यामध्येही स्क्रॅप मालामध्ये पांढरे पावडरसदृश रसायन सापडले. या रसायनाची शासकीय ड्रग चाचणी कीटद्वारे तपासणी केल्यानंतर त्यात एमडी तथा मेफेड्राॅनसदृश अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले.
दिडकोटींचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत एकूण २ किलाे ४७३ ग्रॅम वजनाची एमडी किंवा मेफेड्राॅन पावडर, दाेन आयशर ट्रक, असा एकूण १ काेटी ४३ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पाेनि. बागवडे, सपाेनि मनाेज शिंदे, उपनिरीक्षक म्हस्के, हवालदार लालाखान पठाण, अमलदार संदीप धर्मे, सतीश जाधव, विजय त्रिभुवन, नितेश सुंदर्डे, महेश उगले, छाया लांडगे, शिल्पा तेलाेरे यांच्या पथकाने केली.