छत्रपती संभाजीनगरात उच्चभ्रू युवकांना एमडी ड्रग्ज विकणारा स्मगलर जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:35 IST2025-12-30T15:30:25+5:302025-12-30T15:35:02+5:30
दर दहा दिवसांनी मुंबईहून शहरात तस्करी : रेल्वेने प्रवास; वडील अमली पदार्थांच्या तस्करीत कारागृहात, मुख्य तस्कर पोलिसांना पाहून अंधारात पसार

छत्रपती संभाजीनगरात उच्चभ्रू युवकांना एमडी ड्रग्ज विकणारा स्मगलर जेरबंद
छत्रपती संभाजीनगर : बीड बायपास, पैठण रोडवरील उच्चभ्रू वसाहतीत व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एमडी व अन्य ड्रग्ज विकणाऱ्या शेख मिजान शेख नईम (२७, रा. सिल्क मिल कॉलनी) याला एएनसीने (अमली पदार्थ प्रतिबंधक पथक) अटक केली. पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत त्याचा म्होरक्या मात्र अंधारात पसार झाला. मिजानच्या ताब्यातून ०.८९ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले.
रेल्वेस्थानकाच्या सुरक्षा भिंतीजवळ एमडी ड्रग्ज विक्रीसाठी दोन तरुण येणार असल्याची माहिती एएनसी पथकाला मिळाली. वरिष्ठांच्या सूचनेवरून सहायक पोलिस निरीक्षक रविकांत गच्चे यांनी सहकाऱ्यांसह सापळा रचला. रविवारी रात्री ११.३० वाजता संशयित इसम येताच पोलिसांनी धाव घेतली. मात्र, पोलिसांची कुणकुण लागताच दोघांनी पळ काढला. यात मिजान पळताना रस्त्यावर पडल्याने सापडला. त्याचा म्होरक्या पसार झाला. मिजानच्या ताब्यात ०.८९ ग्रॅम एमडी ड्रग्ज व मनमाडचे रेल्वे तिकीट सापडले. अंमलदार लालखान पठाण, नवाब शेख, नितेश सुंदर्डे, सतीश जाधव, विजय त्रिभुवन यांनी कारवाई केली.
वडीलही सराईत गुन्हेगार
मिजानचे वडील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून हर्सूल कारागृहात आहेत. मिजानवरही पिस्तूल बाळगणे, हत्येचा प्रयत्न व अमली पदार्थ तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. मिजानचा बायपास, पैठण रस्त्यावरील महाविद्यालय, उच्चभ्रू वसाहतींमध्ये वावर असतो. त्याच परिसरात त्याचे अनेक ड्रग्जचे ग्राहक आहेत. पोलिस तीन महिन्यांपासून त्याच्या मागावर हाेते. रविवारी देखील त्याला पकडण्यापूर्वीच त्याने मुंबईहून आणलेले बहुतांश ड्रग्ज विकले होते.
कैफ कुरेशी कोण?
मिजानच्या अटकेनंतर पहिल्यांदाच शहरात एमडी ड्रग्जचा मुख्य विक्रेत्यांपैकी एक असलेल्या कैफ कुरेशीचे नाव समोर आले आहे. कैैफ मदनी चौक परिसरात राहतो. मिजान त्याच्याच रॅकेटचा सदस्य आहे. भिवंडीच्या मस्तान आरिफ नावाच्या तस्कराकडून दोघे दर दहा दिवसांंनी शहरात ३०० ते ५०० ग्रॅम ड्रग्ज आणून विकतात.
१ हजार प्रति ग्रॅममध्ये खरेदी, २ हजारांत विक्री
मिजान व कैफ मुंबईच्या मस्तानकडून १ हजार रुपये प्रतिग्रॅम एमडी पावडर खरेदी करतात. शहरात २ हजार ते २२०० रुपये दराने विकतात. परिचयाच्या ग्राहकांना व त्यांच्या मार्फतच हे रॅकेट चालते. यात पैठण रोड व बायपास परिसरातील दोन बड्या महाविद्यालयांतील ड्रग्जविक्री यापूर्वीही उघडकीस आली होती.