स्मार्ट सिटीच्या कंत्राटदाराचा नागरिकांच्या जिवाशी खेळ; पुलासाठीच्या खड्ड्यात दुचाकी कोसळली

By मुजीब देवणीकर | Published: November 21, 2023 11:55 AM2023-11-21T11:55:12+5:302023-11-21T11:56:16+5:30

कंत्राटदार कंपनीने सुरक्षेचे कोणतेही उपाय केले नाहीत. उलट मनपाच्या ड्रेनेजलाईन फोडून टाकल्या.

Smart City contractor playing with citizens' lives; Pit dug for bridge, bike rider injured in accident | स्मार्ट सिटीच्या कंत्राटदाराचा नागरिकांच्या जिवाशी खेळ; पुलासाठीच्या खड्ड्यात दुचाकी कोसळली

स्मार्ट सिटीच्या कंत्राटदाराचा नागरिकांच्या जिवाशी खेळ; पुलासाठीच्या खड्ड्यात दुचाकी कोसळली

छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटीने शहरातील १०१ रस्ते गुळगुळीत करण्याचे काम ए. जी. कन्स्ट्रक्शन्स कंपनीला दिले. कंत्राटदार नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला. उल्कानगरीतील ओंकारेश्वर चौक ते स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलासाठी जेसीबीने मोठ्ठा खड्डा खोदून ठेवला. खड्ड्याच्या आसपास सुरक्षेचे कोणतेही उपाय करण्यात आले नाहीत. त्यामुळे रविवारी रात्री बुलेटचालक खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाला.

महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या निधीतून ३१७ कोटींची कामे सुरू आहेत. आतापर्यंत ७० रस्त्यांची कामे पूर्ण झाली. १०१ रस्त्यांवरील ९ पुलांच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. ओंकारेश्वर चौक येथे ए. जी. कन्स्ट्रक्शन्स कंपनीने जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम केले. खोदकाम केल्यानंतर चारही बाजूने बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर रिबीनसुद्धा लावण्यात आले नाहीत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनधारकांना सूचना देणारे फलकही लावले नाहीत. निव्वळ मातीचा ढिगारा करून ठेवला. या भागातील एक नागरिक रविवारी रात्री बुलेटवरून जात असताना त्यांना खड्डा दिसला नाही. बुलेटसह ते खड्ड्यात पडले. चालकाला जबर दुखापत झाली. या घटनेबद्दल चालकाने थेट स्मार्ट सिटीकडे तक्रार केली.

कंत्राटदाराला केवळ सूचना
स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापनाने कंत्राटदारासह पीएमसीला यापुढे रस्त्याची व पुलाची कामे करताना योग्य प्रकारे काळजी घेण्यात यावी, बॅरिकेड आणि धोक्याची सूचना देणारे फलक लावावेत, एवढीच सूचना केल्याचे कळते. ए. जी. कन्स्ट्रक्शन्स कंपनीने आतापर्यंत तयार केलेल्या रस्त्यांपैकी काही रस्त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याचे उघडकीस आले. काही ठिकाणी रोड पुन्हा खोदावे लागले. आणखी काही ठिकाणी खोदावे लागणार आहेत. रस्त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांची नेमणूक केली. तज्ज्ञांनी आपल्या अहवालात कामाची चिरफाड केली. त्यानंतरही गुणवत्तेत सुधारणा झाली नाही. कटकट गेट येथे रस्त्याच्या उंचीचा प्रश्न कायम आहे.

Web Title: Smart City contractor playing with citizens' lives; Pit dug for bridge, bike rider injured in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.