लाडक्या भावाला राखी बांधून परतणाऱ्या बहिणीचा अपघातात मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 19:14 IST2022-08-12T19:14:10+5:302022-08-12T19:14:40+5:30
कारची- दुचाकीची धडक : सलीम अली सरोवर परिसरातील घटना

लाडक्या भावाला राखी बांधून परतणाऱ्या बहिणीचा अपघातात मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
औरंगाबाद : आपल्या लाडक्या भावाला राखी बांधून दुचाकीवर सासरी परतणाऱ्या बहिणीचा अपघातातमृत्यू झाल्याची घटना हडको कॉर्नर ते दिल्ली गेट या रोडवरील सलीम अली सरोवर परिसरात गुरुवारी सकाळी ११ वाजता घडली. मंजूषा ऊर्फ संगीता शिवाजी कासार (४७ रा. पिंप्री हवेली, ता. नांदगाव, जि. नाशिक) असे अपघातातमृत्यूू झालेल्या बहिणीचे नाव आहे.
मंजूषा या हडको कॉर्नर परिसरात राहणारे भाऊ गजानन अन्वेकर यांना राखी बांधण्यासाठी बुधवारी रात्री शहरात आल्या होत्या. मंजूषा या आशा वर्कर असल्याने त्यांना रक्षाबंधनाच्या दिवशीच लसीकरणाला जायचे होते. त्यांनी सकाळी साडेदहाच्या सुमारास भावास राखी बांधली. त्यानंतर मंजूषा यांचे बंधू गजानन अन्वेकर हे त्यांच्या दुचाकीवर त्यांना बसस्थानकावर सोडण्यासाठी निघाले. वाटेतच सलीम अली सरोवर परिसरात एमएच २० सीएस ०५५५ या कारने अन्वेकर यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली.
या धडकेत मंजूषा व गजानन अन्वेकर गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता मंजुषा यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी नातेवाईकांच्या तक्रारीनुसार कारचालक ज्ञानेश्वर कारभारी जाधव (रा. घोडेगाव, ता. खुलताबाद) याच्याविरुद्ध सिटी चौक ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.