छत्रपती संभाजीनगर : विद्यादीप बालगृहाच्या सहायक अधीक्षिका व अन्य सिस्टर आमच्यासाठी पालक आहेत. त्यांची सुटका करा, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत, असे म्हणत बालगृहातील मुलींनी शुक्रवारी सायंकाळी बालगृहातच धिंगाणा घातला. मुख्य गेट, खिडक्या, आतील लाेखंडी ग्रील जोरजोरात वाजवून त्यांनी घोषणाबाजी केल्याने परिसरात काही काळ तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. मात्र, पोलिस, बाल कल्याण समितीने वेळीच धाव घेत त्यांची समजूत घातल्यानंतर मुली शांत झाल्या.
३० जून रोजी याच बालगृहातून नऊ मुली पळून गेल्याच्या घटनेनंतर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. औरंगाबाद खंडपीठासह राष्ट्रीय महिला आयोगाने आदेश दिल्याने पोलिसांनी यात बालगृहाच्या व्यवस्थापन पाहणाऱ्या चार महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात बुधवारी सायंकाळी अधीक्षिका वेलरी भगवान जोसेफ (वय ३१), सिस्टर सुचिता भास्कर गायकवाड (५६), केअर टेकर अलका फकीर साळुंके (४६) यांना अटक करण्यात आली. गुरुवारी न्यायालयाने या तिघींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यांच्या जामिनावर शनिवारी सुनावणी होणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
सायंकाळी नेमके काय घडले ?बालगृहात सध्या जवळपास ८० मुली वास्तव्यास आहेत. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास या मुली अचानक आक्रमक झाल्या. बालगृहातील तीन महिलांना अटकेच्या विरोधात त्यांनी आरडाओरड, घोषणाबाजी करत भावना व्यक्त केल्या. लोखंडी गेट, खिडक्या, बालगृहाचे आतील लोखंडी ग्रील जोरजोरात वाजवणे सुरू केले. आसपासच्या रहिवाशांना नेमके काय झालेय, हे कळत नव्हते. मोठा गोंधळ झाल्याचे कळताच पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक आयुक्त संजय सानप, सहायक निरीक्षक विकेक जाधव, दामिनी पथकाच्या कांचन मिरधे, बाल कल्याण समितीच्या प्रमुख ॲड. आशा शेरखाने-कटके यांनी तत्काळ बालगृहात धाव घेतली.
रात्री ९ वाजेपर्यंत समजूतवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मुलींशी जवळपास अडीच तास चर्चा केली. त्यांना गुन्हा का दाखल झाला, कायद्याच्या व्याख्या, अटक व जामिनाची प्रक्रिया समजून सांगण्यात आली. त्यानंतर त्यांचे सर्व म्हणणे ऐकून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. मुलींचे बालगृहातील महिला कर्मचाऱ्यांसोबत भावनिक संबंध असल्याने त्या आज व्यक्त झाल्या, त्यांची समजूत घालण्यात आली असून, त्या शांत झाल्याची माहिती पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी सांगितले.
काय होत्या मागण्या ?मुलींनी बालगृहाच्या सिस्टर, सहायक अधीक्षकांच्या अटकेवर तीव्र संताप व्यक्त करत त्यांची सुटका करण्याची मागणी केली. शिवाय, एका महिला वकिलाने त्या नऊ मुलींना पळून जाण्यासाठी, बालगृहाविरोधात बोलण्यासाठी उद्युक्त केल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.