छत्रपती संभाजीनगर हादरलं! १ कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याचे अपहरण करून निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 11:57 IST2025-12-29T11:56:22+5:302025-12-29T11:57:39+5:30
सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील घटना; चाळीसगाव घाटात फेकला मृतदेह, ५ आरोपीना ठोकल्या बेड्या

छत्रपती संभाजीनगर हादरलं! १ कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याचे अपहरण करून निर्घृण हत्या
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड: तालुक्यातील बोदवड येथील तुकाराम माधवराव गव्हाणे या शेतकऱ्याच्या अपहरणाचे रूपांतर एका भीषण शोकांतिकेत झाले आहे. एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांनी अखेर गव्हाणे यांची हत्या करून त्यांचा मृतदेह चाळीसगाव घाटात फेकून दिला. सोमवारी पहाटे ५ वाजता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अजिंठा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने ५ आरोपींना अटक केली असली, तरी एका निरपराध शेतकऱ्याचा जीव गेल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
असा घडला थरार
तुकाराम गव्हाणे हे शनिवारी मका विकलेले पैसे आणण्यासाठी उंडणगाव येथे गेले होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास घरी परतत असताना अज्ञात इसमांनी त्यांचे अपहरण केले. मध्यरात्री त्यांच्याच फोनवरून मुलाला फोन आला, "वडिलांचे अपहरण केले आहे, १ कोटी रुपये घेऊन तयार राहा." घाबरलेल्या मुलाने तत्काळ अजिंठा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांची धावपळ, पण...
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी रविवारी दिवसभर आणि रात्रभर कोंबिंग ऑपरेशन राबवले. विविध पथके रवाना केली. मुलाने आरोपींना पैसे देण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र, पोलिसांनी आरोपींना गाठण्यापूर्वीच या नराधमांनी तुकाराम गव्हाणे यांची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घाटात फेकला. ५ आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे, मात्र तुकाराम गव्हाणे यांना जिवंत वाचवू न शकल्याची हळहळ व्यक्त होत आहे. हत्येचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.