चालत्या ट्रकचे टायर निखळले अन् मागे येणाऱ्या दुचाकीस्वाराला चिरडले; ४८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 15:15 IST2026-02-26T15:14:04+5:302026-02-26T15:15:01+5:30

सिल्लोड-भोकरदन रस्त्यावर विचित्र अपघात; वाहन पोलिसांनी केले जप्त

Sillod-Bhokardan Road Accident: Moving Truck Wheels Dislodge, Kill Motorcyclist Raju Dudhe | चालत्या ट्रकचे टायर निखळले अन् मागे येणाऱ्या दुचाकीस्वाराला चिरडले; ४८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

चालत्या ट्रकचे टायर निखळले अन् मागे येणाऱ्या दुचाकीस्वाराला चिरडले; ४८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

सिल्लोड : सिल्लोड-भोकरदन रस्त्यावरील सोयगावदेवी पाटीजवळ बुधवारी (दि. २५) दुपारी १२ वाजेच्या सुमारास एक अत्यंत विचित्र आणि भीषण अपघात घडला. पुढे चालणाऱ्या १० टायरी ट्रकची मागची दोन चाके अचानक निखळून पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडकली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. राजू बाबुराव दुधे (वय ४८, रा. खोडकाईवाडी, ता. सिल्लोड) असे मयताचे नाव आहे.

खोडकाईवाडी येथील राजू बाबुराव दुधे हे त्यांच्या दुचाकीने (एमएच २० जीए ७०७५) सिल्लोडकडून भोकरदनकडे एका खासगी कंपनीत नोकरीसाठी जात होते. त्याच वेळी त्यांच्या पुढे एक लोडिंग ट्रक (आरजे ०२ जीसी ६०६१) जालन्याच्या दिशेने जात होता. अचानक या चालत्या ट्रकचे एक्सल तुटल्याने पाठीमागील दोन टायर निखळले आणि वेगात असलेल्या राजू दुधे यांच्या दुचाकीला येऊन धडकले. या जोरदार धडकेमुळे दुधे हे दुचाकीवरून खाली कोसळले आणि त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली.

या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी जखमी दुधे यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, रुग्णवाहिकेतून जात असताना फुलंब्रीजवळ त्यांची प्राणज्योत मालवली.

ट्रकचालकावर गुन्हा दाखल
या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे. मृत राजू दुधे यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. बुधवारी सायंकाळी ७ वाजता खोडकाईवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title : ट्रक का टायर निकला, बाइक सवार कुचला: 48 वर्षीय की मौत

Web Summary : सिल्लोड-भोकरदन मार्ग पर ट्रक का टायर निकलने से बाइक सवार राजू दुधे, 48 की मौत हो गई। अस्पताल ले जाते समय दुधे ने दम तोड़ दिया। पुलिस ने ट्रक चालक के खिलाफ मामला दर्ज कर वाहन जब्त कर लिया है। उनके परिवार में पत्नी और बच्चे हैं।

Web Title : Truck Tire Detaches, Crushes Biker: 48-Year-Old Dies

Web Summary : A truck tire detached on the Sillod-Bhokardan road, fatally hitting a motorcyclist, Raju Dudhe, 48. Dudhe died en route to the hospital. Police have filed a case against the truck driver and seized the vehicle. He is survived by his wife and children.