३५ वऱ्हाडी असलेल्या ट्रकमध्ये वीज उतरली; सिल्लोड पोलिसांनी जीवाची पर्वा न करता वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 20:01 IST2026-02-20T20:00:42+5:302026-02-20T20:01:37+5:30
वऱ्हाडाचा ट्रक विजेच्या खांबावर धडकून भीषण अपघाततात एक महिला ठार, ८ गंभीर जखमी

३५ वऱ्हाडी असलेल्या ट्रकमध्ये वीज उतरली; सिल्लोड पोलिसांनी जीवाची पर्वा न करता वाचवले प्राण
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड: जळगावहुन श्रीरामपूरकडे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या एका आयशर ट्रकचा सिल्लोड-भराडी रस्त्यावरील आंबा फाट्याजवळ भीषण अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्याने भरधाव ट्रक थेट विजेच्या खांबाला जाऊन धडकल्याने एक महिला जागीच ठार झाली, तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकवर विजेच्या तारा तुटून पडल्याने ३५ प्रवाशांच्या जिवावर बेतले होते, मात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांनी लाकडाच्या सहाय्याने तारा बाजूला करत मोठा अनर्थ टाळला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
पहाटे ३.३० वाजता मृत्यूचा थरार
जळगाव जिल्ह्यातील शेलगाव येथील ३० ते ३५ वऱ्हाडी मुलीच्या लग्नासाठी श्रीरामपूरकडे जात होते. पहाटे ३.३० च्या सुमारास वांगी बुद्रुक जवळील आंबा फाट्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने आयशर ट्रक (MH-19-CX-3254) रस्त्याखाली उतरून विजेच्या खांबावर धडकला. धडक इतकी जोरात होती की विजेचा खांब मोडून तारा थेट ट्रकवर पडल्या.
पोलिसांनी वाचवले ३५ जीव
ट्रकमध्ये वीज उतरण्याच्या भीतीने प्रवासी आरडाओरड करत होते. याचवेळी गस्तीवर असलेल्या सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी (पीआय रवींद्र ठाकूर, भिकन संतुके, यतीन कुलकर्णी व पथक) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जीवाची पर्वा न करता लाकडाच्या सहाय्याने त्यांनी विजेच्या तारा बाजूला केल्या आणि महावितरणशी संपर्क साधून वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे ट्रकमधील ३५ प्रवाशांचे प्राण वाचले.
मृतांची आणि जखमींची माहिती
या अपघातात रेखाबाई वसंत गोसावी (रा. बोदवड) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर ब्रह्मा गोसावी, प्रमिलाबाई गोसावी, सविता गोसावी यांच्यासह ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी जळगावला हलवण्यात आले आहे.
चालक फरार
अपघात होताच चालक घटनास्थळावरून पसार झाला. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.