पुण्यात येऊ की कणकवलीत? प्रकाश महाजन यांनी राणेंविरोधात थोपटले दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:51 IST2025-06-11T15:50:10+5:302025-06-11T15:51:39+5:30

‘मी डोक्यावर कफन बांधले आहे, राणे नावाच्या राजकीय गुंडाविरुद्ध लढायला मी तयार आहे, असे सांगत शड्डू ठोकला. ‘राणे तुम्ही सांगा मी पुण्यात येऊ की कणकवलीत?’

Should we come to Pune or Kankavali? Prakash Mahajan challenges Narayan Rane | पुण्यात येऊ की कणकवलीत? प्रकाश महाजन यांनी राणेंविरोधात थोपटले दंड

पुण्यात येऊ की कणकवलीत? प्रकाश महाजन यांनी राणेंविरोधात थोपटले दंड

छत्रपती संभाजीनगर : मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मंगळवारी भाजपचे खा. नारायण राणेंविरोधात दंड थोपटले. राणे यांनी सोमवारी ‘पुन्हा आमच्याविरोधात बोललात, तर उलट्या करायला लावीन’ अशी धमकी महाजन यांना दिली होती. त्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी ‘मी डोक्यावर कफन बांधले आहे, राणे नावाच्या राजकीय गुंडाविरुद्ध लढायला मी तयार आहे, असे सांगत शड्डू ठोकला. ‘राणे तुम्ही सांगा मी पुण्यात येऊ की कणकवलीत?’ असे आव्हानही त्यांनी दिले.

प्रकाश महाजन आणि राज्यातील भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून हमरीतुमरी सुरू आहे. दोघांनी एकमेकांवर जोरदार टीका केली आहे. नारायण राणे यांनी त्यांच्या मुलावर चांगले संस्कार करायला हवे. नितेश राणे हे व्यर्थ बडबड करतात, असा आरोप महाजन यांनी केला होता. या आरोपानंतर खा. राणे यांनी महाजन यांना आमच्या नादाला लागू नको, उलट्या करायला लावीन, अशी धमकी दिली होती. राणे यांच्या धमकीनंतर महाजन यांना दोन दिवसांपासून फोनवरून जिवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. धमक्यांचे कॉल महाजन यांनी रेकॉर्ड करून ठेवले आहेत.

थेट आव्हान
दरम्यान, राणे यांना उत्तर देण्यासाठी महाजन मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्यासमवेत डोक्याला कफन बांधून क्रांती चौकात आले. तेथे पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी ‘मला धमक्या काय देता? तुम्हाला मला मारायचे असेल तर तुमच्या पुण्यातील घरी येऊ की, कणकवलीत येऊ? तुम्ही मंत्री असताना दिलेली जमीन न्यायालयाने रद्द केली. या जागेच्या बदल्यात तुम्हाला पुण्यात बंगला मिळालाय ना, असे आव्हान दिले.

खपवून घेणार नाही
राणेंच्या प्रचारासाठी राजसाहेब गेले होते. मी पण होतो; पण त्यांचे चिरंजीव नितेश राणे यांना त्यांनी कसे बोलायचे हे शिकवले नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांचा संदर्भ देऊन तो काहीही बोलत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही, असे महाजन म्हणाले.

Web Title: Should we come to Pune or Kankavali? Prakash Mahajan challenges Narayan Rane