धक्कादायक! अतिदक्षता विभागातून वृद्ध रुग्णाचे साडेपाच तोळ्यांचे दागिने लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 18:20 IST2025-07-17T18:10:49+5:302025-07-17T18:20:01+5:30
बजाज रुग्णालयातील प्रकार; रुग्णालयाची उडवाउडवीची उत्तरे, सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

धक्कादायक! अतिदक्षता विभागातून वृद्ध रुग्णाचे साडेपाच तोळ्यांचे दागिने लंपास
छत्रपती संभाजीनगर : अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याच्या साडेपाच तोळ्यांच्या बांगड्या अज्ञाताने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, हात सुजल्यामुळे एमआरआयदरम्यानही न काढता आलेल्या या बांगड्या चोराने कापून काढल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी येथील शेतकरी शिरीष लघाने (५०) यांच्या ७० वर्षीय आई उर्मिला यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. २८ जून रोजी मध्यरात्री त्यांना बजाज रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या हातात सोन्याच्या बांगड्या होत्या. २९ जून रोजी उर्मिला यांना एमआरआय तपासणीसाठी नेण्यात आले. तपासणीनंतर त्यांना पुन्हा अतिदक्षता विभागाच्या १३ क्रमांकाच्या बेडवर हलवण्यात आले. त्यानंतर ४ जुलै रोजी रात्री ८ वाजता प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले. त्यावेळी शिरीष यांनी आईच्या हाताकडे पाहिल्यावर बांगड्या गायब असल्याचे लक्षात आले.
रुग्णालयाने जबाबदारी झटकली
शिरीष यांनी तत्काळ ही बाब बजाज रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी कर्मचाऱ्यांकडे विचारपूस करण्याची विनंती केली. मात्र, डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणताही ठोस प्रतिसाद न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त शिरीष यांनी सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संग्राम ताठे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले अधिक तपास करत आहेत.
हात सुजलेला असतानाही बांगड्या काढल्या
एमआरआय तपासणीदरम्यान उर्मिला यांचा हात सुजलेला असल्यामुळे बांगड्या काढणे शक्य नव्हते. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी "मेटल वस्तूने अडथळा येतो, पण सोन्याचा नाही," असे सांगून तपासणी केली. सातारा पोलिसांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एमआरआयच्या आधी आणि नंतरही उर्मिला यांच्या हातात बांगड्या असल्याचे दिसून आले आहे, तसेच उर्मिला यांच्या प्रकृतीमुळे त्यांचे हात अतिदक्षता विभागात बेल्टने बांधलेले होते. त्यामुळे बांगड्या चोरणाऱ्याने हा बेल्ट सोडून, सुजलेल्या हातातून बांगड्या कापून नेल्याचा संशय पोलिसांना आहे.