- बापू सोळुंके
छत्रपती संभाजीनगर : दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यासाठी राखीव असलेले पाणी नाशिक जिल्ह्यातील दारणा प्रकल्पातून भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातला देण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या शिफारशीवरून मिरगाव (ता. सिन्नर) येथील कॅप्टन अशोक खरातच्या शिवनिका संस्थानाला दररोज ३९ लाख लिटर पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयावर ३१ जुलै २०२० रोजी मंत्रिमंडळ उपसमितीने शिक्कामोर्तब करून शासन आदेशही जारी केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या खरातचे विविध कारनामे आता समोर येत आहेत. मिरगाव येथे उभारलेल्या शिवनिका संस्थानासाठी पाण्याची मोठी गरज होती. तेथे त्याने बाग, बगिचा लावला होता. यासाठी त्याने राजकीय वजन वापरून दारणा धरणातून थेट संस्थानपर्यंत तब्बल ४८ किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकण्याचा प्रस्ताव सादर केला होता.
हा प्रस्ताव स्थानिक पाटबंधारे कार्यालयामार्फत गोदावरी महामंडळाकडे पाठविण्यात आला. महामंडळाच्या तत्कालीन कार्यकारी संचालकांनी ५ जानेवारी २०२० रोजी या प्रस्तावाला मंजुरी देत शासनाकडे पाठवले. त्यानंतर दारणा धरणातील पाणी गोदावरी उजव्या तट कालव्यातून बिगर सिंचन वापरासाठी खरात याच्या संस्थेला देण्यास मंजुरी देण्यात आली.
मान्यता आणि लगेच शासन निर्णयही जारी....मंत्रिमंडळ उपसमितीने ३१ जुलै २०२० रोजी या प्रस्तावाला अंतिम मान्यता देत ३९ लाख लिटर पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातील शासन निर्णयही त्याच दिवशी जारी करण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, कॅप्टन खरात याने राजकीय प्रभावाचा वापर करून हे पाणी मंजूर करून घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
...तर ७२ हजार लोकांची तहान भागली असती
जायकवाडी प्रकल्पातून छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, कमी पावसामुळे प्रकल्प वारंवार अपुरा पडतो आणि नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागतो. प्रति व्यक्ती दररोज ५५ लिटर पाण्याची गरज लक्षात घेतली, तर भोंदू बाबाला देण्यात आलेल्या ३९ लाख लिटर पाण्यातून सुमारे ७१ ते ७२ हजार नागरिकांची तहान भागू शकली असती, असे अभ्यासक सांगतात.
Web Summary : Captain Ashok Kharat allegedly diverted 3.9 million liters of Marathwada's water daily for his Mirgaon institute via a 48km pipeline, approved using political influence, depriving 72,000 people.
Web Summary : कैप्टन अशोक खरात पर मराठवाड़ा के 39 लाख लीटर पानी को प्रतिदिन 48 किलोमीटर पाइपलाइन के माध्यम से अपने संस्थान में मोड़ने का आरोप है, राजनीतिक प्रभाव का उपयोग करके 72,000 लोगों को वंचित किया।