पायाखालची जमीनच सरकली! अवघ्या १३ महिन्यांच्या बाळाला कॅन्सर...पालकांचा विश्वासच बसेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 19:35 IST2025-10-04T19:34:57+5:302025-10-04T19:35:28+5:30
अवघ्या १३ महिन्यांच्या बाळाला कॅन्सर, हे कसे शक्य ? मराठवाड्यातून वर्षाला १८० कर्करोगग्रस्त बालरुग्ण उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरात

पायाखालची जमीनच सरकली! अवघ्या १३ महिन्यांच्या बाळाला कॅन्सर...पालकांचा विश्वासच बसेना
छत्रपती संभाजीनगर : अवघ्या १३ महिन्यांच्या बाळापासून ते २ वर्षे, ४ वर्षे वयाच्या मुलांना कॅन्सरचे निदान झाले आहे. कॅन्सर म्हटले की मुलांना असे काही होऊ शकते, यावर पालकांचा विश्वासच बसत नाही. ‘डाॅक्टर हे कसे शक्य आहे? परत तपासणी करा’, असे काहीजण म्हणतात. तर काही जण डाॅक्टरच बदलतात. मराठवाड्यातून वर्षाला जवळपास १८० कर्करोगग्रस्त बालरुग्ण उपचारासाठी शहरात दाखल होतात. यातील ८० टक्क्यांवर मुले बरी होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.
गेल्या काही वर्षांत बाल कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. मराठवाड्यातून शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयासह (राज्य कर्करोग संस्था) खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या कर्करोगग्रस्त बाल रुग्णांची संख्या मोठी आहे. शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड, बाल कर्करोग विभागप्रमुख डाॅ. अदिती लिंगायत यांच्यासह येथील डाॅक्टर, परिचारिका उपचारासाठी परिश्रम घेतात. शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शनिवारी कॅन्सरमुक्त झालेल्या रुग्णांनी, कुटुंबीयांनी मनोगत व्यक्त केले.
कुटुंबीयांसाठी धक्काच
४ वर्षांच्या मुलीला कॅन्सरचे निदान झाले. कुटुंबीयांना धक्काच बसला. घरात यापूर्वी कुणालाही हा आजार नव्हता. यावर उपचारच नाही, असा समज होता. परंतु यावर उपचार असल्याचे कळल्याने मनोबल वाढले.
- एक पालक
परभणीहून शहरात
अडीच वर्षांच्या पुतण्याला कॅन्सर झाला आहे. उपचारासाठी परभणीहून शहरात ये-जा करतो. या आजाराविषयी सुरुवातीला खूप भीती हाेती. परंतु आता भीती वाटत नाही.
- कर्करोगग्रस्त बालकाचे नातेवाईक
उपचाराने फरक
६ वर्षांपूर्वीच १२ वर्षांच्या मुलाला कॅन्सरचे निदान झाले आहे. आधी तर पायाखालची जमीनच सरकली होती. परंतु उपचारामुळे फरक पडत आहे. त्यामुळे हा आजार सर्दी-खोकल्याप्रमाणे वाटू लागला आहे.
- अन्य एक पालक, रा. देवळाई
बरे होण्याचे प्रमाण अधिक
१७ महिन्यांच्या बाळालाही कॅन्सरचे निदान झाले. कॅन्सरची भीती बाळगता कामा नये. कर्करोगग्रस्त बालरुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे.
- डाॅ. तुषार इधाटे, बाल रक्तविकार व कर्करोग तज्ज्ञ.