तस्करांच्या मीटिंगमध्येच पोलिसांचा छापा; आठवडाभरात नशेच्या ३ हजार बाटल्यांची विक्री उघड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 16:33 IST2026-02-05T16:33:00+5:302026-02-05T16:33:24+5:30

मेडिकलच्या परवान्यावर नशेचा धंदा! गुन्हे शाखेने ३ हजार बाटल्यांचा साठा जप्त करत ५ तस्करांना ठोकल्या बेड्या.

Shocking! 3,000 bottles of intoxicants sold in a week in Chhatrapati Sambhajinagar | तस्करांच्या मीटिंगमध्येच पोलिसांचा छापा; आठवडाभरात नशेच्या ३ हजार बाटल्यांची विक्री उघड!

तस्करांच्या मीटिंगमध्येच पोलिसांचा छापा; आठवडाभरात नशेच्या ३ हजार बाटल्यांची विक्री उघड!

छत्रपती संभाजीनगर : गुन्हे शाखेच्या नऊ दिवसांतील पाच कारवायांत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १६ जणांना अटक झाली. मात्र, तरीही जिन्सीत मेडिकल परवाना असलेल्या व्यावसायिकासह १२ जणांची टोळी अद्यापही नशेच्या औषध विक्रीत सक्रिय होती. गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री किराडपुरा, बायजीपुरा, जिन्सीत एकाच वेळी छापे टाकत पाच तस्करांना अटक केली. तब्बल ३ हजार नशेच्या पातळ औषधांच्या बाटल्यांचा साठा जप्त केला. काही दिवसांपूर्वी आठवडाभरात ३ हजार बाटल्यांइतकाच साठा विक्री केल्याची धक्कादायक माहिती तस्करांच्या चौकशीतून समोर आली.

२४ जानेवारी रोजी गुन्हे शाखेने सर्वप्रथम शहरात पातळ औषधांचा साठा घेऊन येणाऱ्या लातूरच्या तस्करांना अटक केली. त्यात अशपाक शेख हा मुख्य तस्कर रेकॉर्डवर आला. तब्बल १६ जणांना अटक करण्यात आली. या पाच कारवायांतील गुन्ह्यांचा तपास सुरू असताना, गुन्हे शाखेला किराडपुऱ्यात मेडिकल व्यावसायिकाच्या घरात मोठा साठा असल्याची माहिती मिळाली. पाेलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या सूचनेवरून वरीष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक निरीक्षक रविकांत गच्चे, उपनिरीक्षक प्रवीण वाघ, अर्जुन कदम, अभिजित चिखलिकर यांनी पथकासह रात्री ११ वाजता किराडपुऱ्यात छापा टाकला. त्यात ओबेदुल्ला अब्दुल्ला (३२, रा. किराडपुरा) याच्या घरात तब्बल ३ हजार बाटल्यांचा साठा सापडला. अन्य ११ तस्करांच्या माध्यमातून तो या बाटल्यांची विक्री करत होता.

यांना झाली अटक
ओबेदुल्ला अब्दुल्ला सोबत बाटल्यांची विक्री व व्यवहार करणाऱ्या शेख सोफियान शेख नजीर (३४, रा. बायजीपुरा), अब्दुल नावीद खान अब्दुल समी खान (३१, रा. जिन्सी), शेख नावेद शेख हमीद (२५, रा. लेबर कॉलनी) व शेख अय्याज उर्फ शेरु शेख सिराज (४२, रा. किलेअर्क) यांना गुन्हे शाखेने रात्रीतून अटक केली. यांच्या अन्य सात साथिदारांचा पोलिस शोध घेत आहेत.

तीन वर्षांपूर्वी मेडिकल बंद
ओबेदुल्ला अब्दुल्ला याने तीन वर्षांपूर्वी शहागंजमधील मेडिकल बंद केले. मात्र, त्याच परवान्यावर तो गुजरातमधून औषधांसाठी ऑर्डर देत होता. अब्दुल नावीद त्याची बाहेरील विक्री सांभाळत होता. नाविद थेट मुख्य तस्कर शेख अशपाक शेख इसाकच्या संपर्कात होता. शेख अय्याज उर्फ शेरु शेख सिराज हा कुख्यात गुन्हेगार फैजल तेजाचा सख्खा काका आहे. तेजा सध्या कारागृहात आहे. तर शेख नावेद शेख हमीद रुग्णालयांमध्ये कर्मचारी पुरवण्याचे कंत्राट घेतो.

बैठक सुरू असतानाच छापा
शहरातील काही मुख्य तस्करांना अटक झाली, तर काही भूमिगत झाले. यात नशेच्या औषधांची कमतरता आल्याने ओबेदुल्लाने त्याचा गैरफायदा घेण्याचे ठरवले. चढ्या दराने विक्रीबाबत मंगळवारी बैठक घेतली. त्याच वेळी गुन्हे शाखेने छापा मारला. बाटल्यांवरील लेबल काढून ते विक्री करत होते. विशेष म्हणजे, तरीही आठवड्याला तीन हजार नशेच्या बाटल्यांची विक्री होत असल्याची माहिती त्यांच्या चौकशीतून समोर आली.

Web Title : तस्करों की बैठक में पुलिस का छापा; हजारों बोतलें जब्त!

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में पुलिस ने नशा तस्करों की बैठक पर छापा मारा, पांच गिरफ्तार और 3,000 नशीली तरल की बोतलें जब्त कीं। जांच में पता चला कि गिरोह पहले की गिरफ्तारियों के बाद कमी का फायदा उठाकर साप्ताहिक रूप से इतनी ही मात्रा बेचता था। मुख्य डीलर दवाओं का ऑर्डर देने के लिए पुराने मेडिकल लाइसेंस का उपयोग करता था।

Web Title : Police Raid Drug Dealers' Meeting; Thousands of Bottles Seized!

Web Summary : Police raided a drug dealers' meeting in Chhatrapati Sambhajinagar, arresting five and seizing 3,000 bottles of intoxicating liquid. The investigation revealed the gang sold a similar amount weekly, exploiting shortages after previous arrests. The main dealer used an old medical license to order drugs.