शिवाजीनगर भुयारी मार्गाचे २५ कोटी पाण्यात; यंत्रणांचे एकमेकांवर आरोप, तज्ज्ञांनी काढले मुर्खात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 19:26 IST2025-05-21T19:26:28+5:302025-05-21T19:26:48+5:30
काम सुरू करण्यापूर्वीच पाणी निचऱ्याचे नियोजन हवे होते

शिवाजीनगर भुयारी मार्गाचे २५ कोटी पाण्यात; यंत्रणांचे एकमेकांवर आरोप, तज्ज्ञांनी काढले मुर्खात
छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर रेल्वे फाटकावर छोटा उड्डाणपूल बांधावा, ही अनेक वर्षांपासून नागरिकांची मागणी होती. रेल्वे प्रशासन आणि सा. बां. विभागाने पूल रद्द करून भुयारी मार्गाचे नियोजन केले. २५ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या प्रकल्पाचे परिणाम शहरवासीयांना भोगावे लागत आहेत. भुयाराचे काम सुरू करतानाच पावसाच्या पाणी निचऱ्याचे नियोजन, आर्थिक तरतूद करावी लागते. त्याच्याशिवाय काम पुढे सरकतच नाही. आता संपूर्ण काम झाल्यावर शासकीय यंत्रणांनी एकमेकांवर आरोप करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा म्हणावा लागेल, अशा शब्दात तज्ज्ञ अभियंत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पावसाचा अभियंत्यांनी अभ्यास केला का?
या भागातील काही वर्षांतील पावसाची सर्वोच्च आकडेवारी गृहीत धरूनच स्टॉर्म वॉटरचे नियोजन करावे लागते. एका तासात किती पाऊस पडतो, हे तरी गृहीत धरायला हवे. शिवाजीनगर येथे तज्ज्ञ अभियंत्यांनी अभ्यास केला नाही का? पावसाचे पाणी कुठे न्यायचे हे अधिकाऱ्यांनी अगोदरच ठरवायला हवे होते. झालेले काम अत्यंत चुकीचे आहे. भुयारी मार्गाची उभारणी करताना सांडपाण्याची लाइन कोठून जाणार, हे अगोदर का ठरले नाही? जिथे नियोजन होते तेथे एका रात्रीतून जलवाहिनी, विजेची केबल आली का? इतके दिवस अधिकारी काय करीत होते, असे मत मनपातील निवृत्त शहर अभियंता सी. एस. सोनी यांनी व्यक्त केले.
उड्डाणपूल का रद्द केला?
येथे अगोदर छोटा पूल उभारावा, अशी मागणी होती. पण शिवाजीनगर ते देवळाई चाैक लांबी खूप कमी, असा मुद्दा निघाला. वास्तविक पाहता पूल बांधला असता तर आज मोठी वाहने गेली असती, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नसता, मनपाला सहा कोटी खर्च करून भूसंपादन करावे लागले नसते. मुळात भुयारी मार्गही अत्यंत कमी जागेत उभारला. पावसाचे पाणी नेण्यासाठी जागाच शिल्लक नाही. प्रकल्पाचा आराखडा तयार करताना या बारीक गोष्टींचे नियोजन असते. तज्ज्ञ अभियंते तेव्हा झोपा काढत होते का? आज आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नागरिकांना त्रास होतोय त्याचे काय? असा सवाल मनपाचे निवृत्त शहर अभियंता एम. डी. सोनवणे यांनी केला.