"आम्ही नगरसेवक आहोत..." म्हणत मेल्ट्रॉन रुग्णालयात धिंगाणा! डॉक्टरला सस्पेंड करण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 16:45 IST2026-04-11T16:40:53+5:302026-04-11T16:45:01+5:30
स्वयंघोषित स्वीकृत नगरसेवकासह दोघांवर मध्यरात्री एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल

"आम्ही नगरसेवक आहोत..." म्हणत मेल्ट्रॉन रुग्णालयात धिंगाणा! डॉक्टरला सस्पेंड करण्याची धमकी
छत्रपती संभाजीनगर : स्वत:ला नगरसेवक सांगून एका स्वयंघोषित स्वीकृत नगरसेवकासह दोघांनी मेल्ट्रॉन रुग्णालयात राडा घातला. रुग्णालयात उपस्थित परिचारिका, डॉक्टरांसह अन्य कर्मचाऱ्यांना दमदाटी करत दहशत निर्माण केली. ९ एप्रिलला दुपारी ३:३० वाजता महानगरपालिकेने १० एप्रिलला रात्री १२ वाजता एमआयडीसी सिडको ठाण्यात तक्रार दिल्यानंतर इम्रान सालार (रा. बुढ्ढीलेन), असरार अहमद (रा. रहेमानिया कॉलनी, किराडपुरा) यांच्यावर गुन्हा दाखल केला.
मेल्ट्रॉन रुग्णालयात काम करणाऱ्या अमित साबळे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी कारवाई झाली. ९ एप्रिलला अज्ञात चौघांनी मेल्ट्रॉन रुग्णालयात जात कर्मचारी, डॉक्टरांवर दादागिरी केली. 'आम्ही नगरसेवक आहोत', असे म्हणत रुग्णालयाची पाहणी करण्यास सुरूवात केली. रुग्णालयातील औषधांचा साठा, रुग्णांची नोंदणी रजिस्टर तपासले. त्याच्या झेरॉक्स काढून सोबत घेतल्या. कर्मचाऱ्यांना पगाराविषयी विचारणा केली. त्यातील एकाने डॉ. विकास देवकर यांना सस्पेंड करण्याची धमकी दिली.
मोबाईलमध्ये शूटिंग करून प्रत्येक खोलीचे कुलूप उघडायला लावून दादागिरी केली. डॉ. पारस मंडलेचा यांना कॉल करून त्यांना अर्वाच्य भाषेत सूचना करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे रुग्णांच्या सेवेवर देखील गंभीर परिणाम झाला. यातील आरोपी असरार हा एका पक्षाकडून ‘स्वीकृत नगरसेवक’ म्हणून घोषित होणार असल्याचे सांगून नियुक्तीपुर्वीच त्याने हा प्रकार केला. दरम्यान, मनपातर्फे याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास उशीर केल्याने गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.