अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश रथावर उपमहापौर औताडेंचे ‘सेल्फी सेलिब्रेशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 13:29 IST2018-08-24T13:27:45+5:302018-08-24T13:29:33+5:30
उपमहापौर विजय औताडे यांनी गुरुवारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश रथावर ‘सेल्फी’ सेलिब्रेशन केले.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश रथावर उपमहापौर औताडेंचे ‘सेल्फी सेलिब्रेशन’
औरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावाला विरोध केल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यास मनपा सभागृहात लाथाडणारे उपमहापौर विजय औताडे यांनी गुरुवारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश रथावर ‘सेल्फी’ सेलिब्रेशन केले.
वाजपेयी यांच्या जाण्यामुळे पूर्ण भाजप दु:खात बुडाला असताना ग्राऊंड पातळीवरील पदाधिकारी मात्र अशा पद्धतीने आनंदोत्सव साजरा करीत असल्याचे पाहून जालना रोडवरून जाणाऱ्या नागरिकांनी तोंडात बोट घातले. अस्थिकलश रथावर सेल्फी काढण्याचा हा प्रकार भाजप श्रेष्ठी खपवून घेणार काय? असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे.
गुरुवारी भाजपच्या उस्मानपुरा येथील विभागीय कार्यालयात वाजपेयी यांच्या अस्थींच्या दर्शनासाठी कलश आणण्यात आला होता. कार्यालयात कलशदर्शनासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी ११ वाजेनंतर अस्थिकलश रथ जालन्याकडे रवाना झाला. सेव्हन हिल येथून रथ जात असताना रथावर उपमहापौर औताडे सेल्फींचे सेलिब्रेशन करीत होते. त्यांना माजी नगरसेवक अनिल मकरिये हे दाद देत होते. त्यांच्याकडे आ. सुजितसिंग ठाकूर यांचे लक्ष नव्हते.
भाजप नेते, पदाधिकाऱ्यांकडून दर्शन
वाजपेयी यांच्या अस्थिकलशाचे भाजप नेते, पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दर्शन घेतले. आ. अतुल सावे, आ. सुजितसिंग ठाकूर, उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदीप घुगे, शिरीष बोराळकर, एकनाथ जाधव, किशनचंद तनवाणी यांच्यासह शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कार्यालयावर गर्दी केली होती.