मोठी बातमी! सेंट फ्रान्सिस शाळेचे सचिव ३ लाखांची लाच घेताना रंगेहात अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 13:37 IST2024-12-13T13:36:31+5:302024-12-13T13:37:28+5:30
ही कारवाई संस्थेच्या गंगापूर येथील भारतरत्न मदर टेरेसा इंग्लिश स्कूलमध्ये करण्यात आली.

मोठी बातमी! सेंट फ्रान्सिस शाळेचे सचिव ३ लाखांची लाच घेताना रंगेहात अटकेत
छत्रपती संभाजीनगर : अनुकंपा तत्त्वावर शाळेत रुजू झालेल्या तक्रारदार यांच्या नावाचा समावेश शालार्थ प्रणालित करण्यासाठी आणि वेतन चालू करण्यासाठी तीन लाख रुपये लाच घेताना सेंट फ्रान्सिस डिसेल्स एज्युकेशन सोसायटीच्या सचिवांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी)सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई संस्थेच्या गंगापूर येथील भारतरत्न मदर टेरेसा इंग्लिश स्कूलमध्ये गुरुवारी करण्यात आली.
फादर विल्फ्रेड मार्टिन सालढाना (७५) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार तरुण हे अनुकंपा तत्त्वावर सेंट फ्रान्सिस डीसेल्स एज्युकेशन सोसायटी, छत्रपती संभाजीनगरच्या शाळेत रुजू झाले आहेत. मात्र, शासनाच्या नियमानुसार त्यांना वेतन मिळत नव्हते. यामुळे त्यांनी संस्थेचे सचिव फादर विल्फ्रेड मार्टिन सालढाणा यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी तक्रारदार यांना तुमचे नाव शालार्थ प्रणालित समाविष्ट करण्यासाठी आणि वेतन चालू करण्यासाठी ३ लाख रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.
एसीबीच्या पथकाने १० डिसेंबर रोजी पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यावेळी आरोपीने तक्रारदार यांना त्यांचे काम करण्यासाठी तीन लाख रुपये लाचेची मागणी केली आणि १२ डिसेंबर रोजी लाचेची रक्कम घेऊन बोलावले. ठरल्याप्रमाणे गुरुवारी आरोपी सालढाणा यांनी तक्रारदार यांच्याकडून तीन लाख रुपये लाच घेतली. लाच घेताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलिस निरीक्षक अमोल धस, विजयमाला चव्हाण यांनी पोलिस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.