वसतिगृहातील दूषित पाण्याच्या बाधेची व्याप्ती वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 23:30 IST2019-04-30T23:29:29+5:302019-04-30T23:30:02+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहातील ५० पेक्षा अधिक मुलींना दूषित पाण्यामुळे उलट्या, जुलाबचा त्रास सुरू आहे. यामध्ये मंगळवारी आणखी मोठी भर पडली. रसायनशास्त्र विभागातील २५ पेक्षा अधिक मुलींनी त्रास होत असल्यामुळे १ मेपासून सुरू होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

वसतिगृहातील दूषित पाण्याच्या बाधेची व्याप्ती वाढली
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहातील ५० पेक्षा अधिक मुलींना दूषित पाण्यामुळे उलट्या, जुलाबचा त्रास सुरू आहे. यामध्ये मंगळवारी आणखी मोठी भर पडली. रसायनशास्त्र विभागातील २५ पेक्षा अधिक मुलींनी त्रास होत असल्यामुळे १ मेपासून सुरू होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. एवढा गंभीर प्रकार होऊनही प्रशासनातर्फे दिवसभर कोणीही वसतिगृहाला भेट दिली नाही. शेवटी सायंकाळी ८ वाजता प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. त्यांनाही विद्यार्थिनींच्या रोषाचा सामना करावा लागला.
विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहात दोन दिवसांपूर्वी दूषित पाणीपुरवठा झाल्यामुळे मुलींना जुलाब, उलट्यांचा त्रास सुरू झाला आहे. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी सोमवारी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांना कार्यालयातच घेराव घातला होता. त्रास होत असलेल्या विद्यार्थिनींची संख्या दुसऱ्या दिवशी ५० पेक्षा अधिक झाली आहे. या विद्यार्थिनींवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिली. याचवेळी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील २५ पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी त्रास होत असल्यामुळे २ मेपासून सुरू होणाºया परीक्षेला उपस्थित राहू शकत नाही. अभ्यास करण्याची मन:स्थिती नसल्यामुळे ४ दिवस परीक्षा लांबविण्याची मागणी विभागप्रमुख कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांची भेट घेऊन केली. यावर डॉ. गायकवाड यांनी प्रकुलगुरूं कडून मार्गदर्शन मागविले आहे.
चौकट,
कुलगुरू, कुलसचिव नॉटरिचेबल
वसतिगृहातील विद्यार्थिनींची परिस्थिती बिघडत असताना कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे मंगळवारी दौºयावर रवाना झाले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. याशिवाय वसतिगृहांच्या प्रमुख कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनीही घडलेल्या प्रकारानंतर वसतिगृहाकडे जाण्याचे औदार्य दाखविले नाही. शहरातील विविध समारंभांना त्यांनी हजेरी लावली. मात्र, विद्यार्थिनी वसतिगृहाला भेट दिली नाही. याविषयी त्यांच्या कार्यालयाला भेट दिली असता, त्या कार्यक्रमाला गेल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही.
प्रकुलगुरूंना पुन्हा घातला घेराव
प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी सायंकाळी ८ वाजता विद्यार्थिनी वसतिगृहाला भेट दिली. तेव्हा संतप्त विद्यार्थिनींना त्यांना घेराव घालत संताप व्यक्त केला. उद्या दिवसभरात सर्व परिस्थिती आटोक्यात आणली जाईल, सर्वांना स्वच्छ पाणी पिण्यास मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. एसएफआय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत दोन दिवसात पाणीपुरवठा व्यवस्थित न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी स्टॅलीन आडे, लोकशे कांबळे, कावेरी गोरे, सपना वाघमारे, श्रीनिवास लटके, नम्रता कुरील, प्रतीक्षा गोरे, सारिका शिंदे, रवी खंदारे आदींची उपस्थिती होती.
शिवसेना, ‘अभाविप’ची प्रशासनाला तंबी
शिवसेनेचे शहर उपप्रमुख हिरा सलामपुरे, भाविसेचे संघटक डॉ. तुकाराम सराफ, पूनम सलामपुरे आदींच्या शिष्टमंडळाने विद्यार्थ्यांसह प्रकुलगुरूंची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोषी अधिकारी, कर्मचाºयांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. विद्यार्थिनी पूनम पाटील, उत्कर्षा सदावर्ते, पूनम बनसोड, अजिंक्य वाघमारे, अजय बिडला, अतुल पाटील आदी उपस्थित होते. अभाविपच्या शिष्टमंडळानेही प्रकुलगुरूंची भेट घेतली. दोषींवर कारवाई करीत अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून तपासणी करण्याची मागणी केली. यावेळी अधिसभा तथा विद्यार्थिनी वसतिगृह समिती सदस्या डॉ. योगिता होके पाटील, महानगरमंत्री शिवा देखणे, रामेश्वर काळे, डिंपल भोजवानी, महेंद्र मुंडे आदींची उपस्थिती होती.