शेंद्रा एमआयडीसीत स्कूलबसने दुचाकीला उडवले, एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 14:03 IST2022-12-09T14:03:03+5:302022-12-09T14:03:33+5:30
अपघातात मृत आणि एक जखमी परराज्यातील असल्याची माहिती आहे

शेंद्रा एमआयडीसीत स्कूलबसने दुचाकीला उडवले, एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
करमाड ( औरंगाबाद) : शेंद्रा एमआयडीसीतील डी-सेक्टरमध्ये वोखार्ड शाळेसमोर रिकाम्या स्कूलबसने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला उडवले. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अजितकुमार उत्तमकुमार रुद्रपाल ( २०, काचर,आसाम, ह.मू. कुंबेफळ ता. औरंगाबाद ) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात आज सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास झाला.
आज सकाळी शेंद्रा एमआयडीसीमध्ये अजितकुमार उत्तमकुमार रुद्रपाल आणि इतर दोघे एका बाईकवर (MH 20 FF 03640) प्रवास करत होते. डी-सेक्टरमध्ये वोखार्ड शाळेसमोर रस्ता ओलांडताना एका स्कूलबसने (MH 20 EG 7285 ) बाईकला जोरदार धडक दिली. यात अजितकुमार रुद्रपाल या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले.
गंभीर जखमींमध्ये औरंगाबाद तालुक्यातील लाडगाव येथील रहिवासी आकाश अनिल साळवे ( 25) आणि परराज्यातील एकाचा समावेश आहे. परराज्यातील तरुणाच्या दोन्ही पायांना जबर मार लागल्याची माहिती आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार जगताप, पोकॉ. दादा पवार यांनी अपघातस्थळी धाव घेतली. सर्व जखमींना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.