जायकवाडीच्या पाण्याची झेप छ. संभाजीनगराकडे; जलवाहिनीत ४ किमीपर्यंत २ कोटी लीटर पाणी आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 16:45 IST2026-03-25T16:40:09+5:302026-03-25T16:45:01+5:30

मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांचा 'मिशन वॉटर' प्लॅन; ३८ किमी जलवाहिनी स्वच्छतेसाठी ८ दिवसांचे लक्ष्य २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी ४ किमीपर्यंत भरली;

Sambhajinagar Water Update: 2500mm Pipeline Filled up to 4km; Water to Reach Nakshatrawadi by April 14 | जायकवाडीच्या पाण्याची झेप छ. संभाजीनगराकडे; जलवाहिनीत ४ किमीपर्यंत २ कोटी लीटर पाणी आले

जायकवाडीच्या पाण्याची झेप छ. संभाजीनगराकडे; जलवाहिनीत ४ किमीपर्यंत २ कोटी लीटर पाणी आले

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी शहराकडे झेपावण्यास सुरुवात झाली असून, मंगळवारी दुसऱ्या दिवशीही २५०० मि.मी. व्यासाच्या महाकाय जलवाहिनीत तब्बल ४ कि.मी.पर्यंत पाणी घेण्यात आले. हे पाणी दोन कोटी लिटर आहे. बुधवारी सकाळी पुन्हा ३७०० अश्वशक्तीचा पंप सुरू करून पाणी जलवाहिनीत घेतले जाईल. ९ कि.मी. जलवाहिनी शुद्ध करण्याचे उद्दिष्ट आहे.

सोमवारी रात्री मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते विधिवत पूजा करून जॅकवेलवर बसविण्यात आलेला ३७०० अश्वशक्ती पंप सुरू करण्यात आला होता. जायकवाडी धरणापासून पैठण साखर कारखान्यापर्यंत म्हणजेच ४ कि.मी.पर्यंत जलवाहिनी स्वच्छ करण्यात आली होती. जलवाहिनीत घेतलेले पाणी स्कोअर व्हॉल्व्हमधून बाहेर सोडण्यात आले होते. मंगळवारी दुपारी पंप सुरू करण्यात आला. एक तास सुरू ठेवून २ वाजता बंद केला. पंपाच्या कूलिंग यंत्रणेत थोडासा बिघाड होता. तो दुरुस्त करून पुन्हा पंप सुरू केला. सायं. ७.१५ वाजेपर्यंत पंप व्यवस्थित सुरू होता. ४ कि.मी.पर्यंत जलवाहिनी पूर्णपणे भरल्यानंतर पंप बंद केला. जलवाहिनीतील हे पाणी बुधवारी दुपारी पुढे ९ किमीपर्यंत नेले जाईल. तेथे स्कोअर व्हॉल्व्हमधून हे पाणी बाहेर सोडण्यात येणार असल्याची माहिती मजीप्रा व जीव्हीपीआर कंपनीतर्फे देण्यात आली. 

आठ दिवसांत जलवाहिनी स्वच्छ
९ किमी जलवाहिनी स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले. संपूर्ण ३८ किमी जलवाहिनी अशाच पद्धतीने टप्प्याटप्प्याने स्वच्छ केली जाणार आहे. यासाठी किमान आठ दिवस लागतील. १४ एप्रिलपर्यंत नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी येईल, या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली.

सतर्कतेसाठी भोंगा फिरविणे सुरू
-जॅकवेलमधील पाणी ३,७०० अश्वशक्तीच्या पंपद्वारे जलवाहिनीत पाणी घेण्याची प्रक्रिया दोन दिवसांपासून सुरू आहे. जलवाहिनीवर ठराविक अंतरावर स्कोअर व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. जलवाहिनी शुद्ध करण्यासाठी ज्या ठिकाणी नदी, नाले आहेत, तेथे अशुद्ध पाणी सोडले जात आहे.
-एकूण १२ ठिकाणी व्हॉल्व्ह आहेत. त्यात ॲप्रोच बंड चेनेज, साखर कारखाना, धनगाव, ढोरकीन, कौडगाव, निलजगाव, फारोळा, आर. एल. स्टील, अजित सीड्स, निसर्ग नर्सरी येथे पाणी सोडण्यात येईल. पाणी सोडल्यानंतर संबंधित भागात पूरसदृश परिस्थिती होईल.
- नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे मजीप्राने कळविले आहे. मंगळवारी दिवसभर ज्या भागात पाणी सोडले जाईल, तेथे भोंगा लावून नागरिकांना सतर्क करण्यात आले.

Web Title : जायकवाड़ी का पानी छत्रपति संभाजीनगर पहुंचा; पाइपलाइन 4 किमी तक भरी।

Web Summary : जायकवाड़ी बांध से पानी अब छत्रपति संभाजीनगर की ओर बह रहा है। पाइपलाइन 4 किमी तक भर गई है, जिसमें दो करोड़ लीटर पानी है। 14 अप्रैल तक आपूर्ति सुनिश्चित करने के लिए सफाई जारी है।

Web Title : Water from Jayakwadi reaches Chhatrapati Sambhajinagar; pipeline fills 4km.

Web Summary : Water from Jayakwadi dam is now flowing towards Chhatrapati Sambhajinagar. The pipeline has been filled up to 4 km, containing two crore liters of water. Cleaning continues to ensure supply by April 14th.