साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरचा घोटाळा : जाधव पितापुत्र घर सोडून पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 15:10 IST2025-12-06T15:05:01+5:302025-12-06T15:10:01+5:30
अडकलेल्या कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत पाेलिस कोठडी, विद्यापीठ प्रशासनाला पत्र पाठवणार

साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरचा घोटाळा : जाधव पितापुत्र घर सोडून पसार
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाण्यातील श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची संलग्नता नसताना संस्थाचालक जे. के. जाधव आणि विक्रांत जाधव या पितापुत्रांनी १३३ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १ लाख १० हजार रुपये शुल्क रुपये उकळत प्रवेशाचा बनाव रचला. मात्र, गुरुवारी परीक्षा येऊन ठेपल्यानंतरही विद्यार्थ्यांना हाॅलतिकीटच न मिळाल्याने विद्यापीठाशी सदर संस्था संलग्नच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल होताच जाधव पितापुत्रांनी पलायन केले. एमआयडीसी सिडको पोलिसांची दोन पथके त्यांचा शोध घेत आहेत.
चिकलठाण्यातील श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरमध्ये २०२५ पासून एमसीए अभ्यासक्रमाला मान्यता मिळालेली आहे. त्यात एमसीएच्या प्रथम वर्षात १३३ विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या माध्यमातून प्रत्येकी एक लाख दहा हजार रुपये शुल्क भरून प्रवेश घेतला. या अभ्यासक्रमांच्या परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात झाली. या विद्यार्थ्यांना बुधवारी रात्रीपर्यंत हॉलतिकीट मिळाले नव्हते. तोपर्यंत संस्थाचालकाने विद्यार्थ्यांना गुरुवारी परीक्षा केंद्रावरच हॉलतिकीट मिळतील, असे आश्वासन दिले. गुरुवारी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. विद्यार्थ्यांनी संस्थाचालकांशी संपर्क साधला असता ही विद्यापीठाची चूक असल्याचे सांगत त्यांनी हात वर केले. मग तेथे विद्यार्थ्यांच्या संतापामुळे गोंधळ उडाला. वरिष्ठ पातळीपर्यंत प्रकरण पोहोचल्यानंतर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात संस्थाचालक पितापुत्रासह दाेन शिक्षकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
कर्मचाऱ्यांची भूमिकाच नाही, आरोपींच्या वकिलांची बाजू
जाधव पितापुत्र पसार झाले. दरम्यान, अटक झालेल्या संघपाळ कांबळे, लक्ष्मण गायकवाड यांना सहायक पोलिस निरीक्षक भारत पाचोळे यांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले. जवळपास तासभर दोन्ही पक्षांकडून बाजू मांडण्यात आली. त्यात कांबळे व गायकवाड हे केवळ कर्मचारी आहेत. व्यवस्थापनाच्या सांगण्यानुसार ते काम करत होते. या फसवणुकीत त्यांची काहीच भूमिका नसल्याचे आरोपींच्या वकिलांनी स्पष्ट केले. शिवाय, गायकवाड यांच्याकडे विद्यार्थ्यांचे कुठल्याच प्रकारचे शुल्क आले नसल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. न्यायालयाने दोघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.