Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये बाॅम्ब हल्ले, हवेत गोळीबार, मी घरी परतलो हे फक्त ‘लक फॅक्टर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 19:59 IST2022-03-03T19:58:24+5:302022-03-03T19:59:00+5:30
Russia-Ukraine War: चिकलठाणा विमानतळावर प्रतीक दाखल झाल्यानंतर त्याच्या आईच्या भावना अनावर झाल्या. प्रतीकच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्यांनी त्याला डोळे भरून पाहिले

Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये बाॅम्ब हल्ले, हवेत गोळीबार, मी घरी परतलो हे फक्त ‘लक फॅक्टर’
औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळाच्या इमारतीतील काचेच्या दरवाजातून प्रतीक बाहेर पडतो. त्याला पाहताच त्याच्या आईच्या अश्रूंचा बांध फुटतो, प्रतीकला त्या जवळ घेतात. प्रतीकच्या चेहऱ्यावरील मास्क काढत ही माता लेकराला डोळे भरून पाहते, चेहऱ्यावरून हात फिरवते. पाठोपाठ प्रतीकचे वडीलही गळाभेट घेतात. युक्रेनमधून ( Russia-Ukraine War) सुखरूप परतलेल्या मुलाला भेटतानाचा हा भावनिक प्रसंग बुधवारी अनेकांच्या काळजाला भिडला. युक्रेनमध्ये बाॅम्ब हल्ले, हवेत गोळीबार होत आहे. मी घरी परतलो हे फक्त ‘लक फॅक्टर,’ अशी भावना त्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
युक्रेनमध्ये ‘एमबीबीएस’च्या तिसऱ्या वर्षात शिकणारा प्रतीक ठाकरे हा बुधवारी औरंगाबादेत परतला. तो परतणार याची माहिती मिळाल्यावर त्याचे वडील अरुण आणि आई विजया ठाकरे या सायंकाळी विमानतळावर गेल्या. त्यांची नजर प्रतीकला शोधत होती. दिल्लीहून इंडिगोच्या विमानाने प्रतीक सात वाजता चिकलठाणा विमानतळावर पोहोचला. त्याला पाहताच अरुण, विजया ठाकरे यांनी त्याच्याकडे धाव घेत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. विजया यांना अश्रू अनावर झाले. प्रतीकने आईचे डोळे पुसले.
‘लोकमत’शी बोलताना प्रतीक म्हणाला, ‘२५ तारखेला पहिल्यांदा हवाई हल्ला झाला. सायरन वाजल्यानंतर इमारतीच्या बंकरमध्ये जावे लागत होते. विद्यापीठाच्या मदतीने बसद्वारे रोमानियाच्या बाॅर्डरपर्यंत पोहोचलाे. रोमानिया येथे दोन दिवस निवारागृहात थांबलो. नंतर भारतीय दूतावासाच्या मदतीने परतलो.’ विमानतळावरील औरंगाबाद सारथी कूल कॅब टॅक्सी असोसिएशनचे पंकज सोनवणे, रवी नाडे, सुरेश राजपूत आदींनी प्रतीकचे स्वागत केले.
तीन दिवस बंकरमध्ये, प्रत्येक इमारतीत बंकर
व्हिनित्सिया येथे ३ दिवस बंकरमध्ये काढावे लागले. या ठिकाणी प्रत्येक इमारतीला बंकर आहेत. खाद्यपदार्थ जपून वापरावे लागले. मोबाइलची बॅटरी टिकावी, म्हणून तो बंद करून ठेवला जात होता. माझे बहुतांश मित्र परतले. काही अडकलेले आहेत, असे प्रतीक म्हणाला.
गर्दी नियंत्रणासाठी गोळीबार
युद्धाची परिस्थिती आहे. बाॅम्ब हल्ले होत आहेत; परंतु नागरिकांवर हल्ले होत नाहीत. बॉर्डरवर मोठी गर्दी आहे. प्रत्येकाची बॉर्डर पार करण्यासाठी धडपड आहे. त्यामुळे गर्दी नियंत्रित करण्यासाठी हवेत गोळीबार केला जातो, असे प्रतीक म्हणाला.
माझा प्रतीक आला, इतरांचीही मुले परतावीत
माझा प्रतीक परतला. त्याच्याप्रमाणे प्रत्येक पालकाची मुले परतावीत, हीच प्रार्थना आहे, अशी भावना विजया यांनी व्यक्त केली. मी येत आहे, असा मेसेज आला आणि रिलॅक्स झालो, तो परतला, हा आनंददायी क्षण आहे, असे अरुण ठाकरे म्हणाले.