पेट्रोल मिळत नसेल तर गाडी कशाला पाहिजे? तरुणाने भररस्त्यात स्वतःचीच बाइक पेटवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 17:31 IST2026-03-28T17:27:18+5:302026-03-28T17:31:51+5:30
सिल्लोडमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तरुणावर पोलीस कारवाई.

पेट्रोल मिळत नसेल तर गाडी कशाला पाहिजे? तरुणाने भररस्त्यात स्वतःचीच बाइक पेटवली
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड: इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेल टंचाई निर्माण झाल्याच्या अफवेने एका तरुणाने चक्क आपली मोटारसायकल भररस्त्यात पेटवून दिली. सिल्लोड-कन्नड रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला. शरद गणपत भोजने (रा. सावखेडा) असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. शरद याने दारूच्या नशेत हा प्रकार केल्याची माहिती असून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
अफवेचा धसका आणि भररस्त्यात अग्नितांडव
मिळालेल्या माहितीनुसार, शरद भोजने हा दारूच्या नशेत असताना त्याने पेट्रोल टंचाईच्या अफवांचा धसका घेतला. "देशावर संकट आहे, पेट्रोल मिळत नसेल तर गाडी कशाला पाहिजे?" असे ओरडत त्याने शुक्रवारी सायंकाळी ६:४० च्या सुमारास आपली मोटारसायकल रस्त्याच्या मध्यभागी उभी करून पेटवून दिली. हा प्रकार पाहून रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली.
युद्धाचा धसका, पेट्रोल मिळत नसेल तर कशाला पाहिजे गाडी म्हणत तरुणाने भररस्त्यात पेटवून दिली स्वतःचीच बाईक; सिल्लोडमधील धक्कादायक प्रकार! #chhatrapatisambhajinagar#marathwada#fuelCrisispic.twitter.com/mXRkOzR9qr
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) March 28, 2026
पोलिसांची धाव आणि गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी पाण्याचे टँकर मागवून आग विझवली आणि जळालेली मोटारसायकल बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलीस कर्मचारी विनोद सरोदे यांच्या तक्रारीवरून, सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शरद भोजने विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा नशा उतरल्यानंतर "नशेत हा प्रकार केला" असे म्हणत आरोपीने पोलिसांसमोर पश्चात्ताप व्यक्त केला.
"अफवांवर विश्वास ठेवू नका"; पोलीस निरीक्षकांचे आवाहन
सोशल मीडियावर पेट्रोल-डिझेल टंचाईबाबत अनेक चुकीचे संदेश फिरत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे की, "जिल्ह्यात कुठेही पेट्रोल किंवा डिझेलची टंचाई नाही. सर्व पंपांवर इंधन सुरळीत मिळत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये किंवा अशा प्रकारची स्टंटबाजी करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल."