ओव्हरलोड वाहतुकीची कारवाई टाळण्यासाठी १८ हजारांची लाच; ‘आरटीओ’चा निरीक्षक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:34 IST2025-06-25T12:33:13+5:302025-06-25T12:34:06+5:30

अहिल्यानगर एसीबीची शहरात कारवाई : एजंटमार्फत १८ हजार घेताना पकडले

RTO inspector arrested by ACB for accepting bribe of Rs 18,000 to avoid action against overloaded vehicles | ओव्हरलोड वाहतुकीची कारवाई टाळण्यासाठी १८ हजारांची लाच; ‘आरटीओ’चा निरीक्षक अटकेत

ओव्हरलोड वाहतुकीची कारवाई टाळण्यासाठी १८ हजारांची लाच; ‘आरटीओ’चा निरीक्षक अटकेत

छत्रपती संभाजीनगर : ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करीत असलेल्या तक्रारदाराला तुरीची डाळ व इतर कडधान्याची वाहतूक करताना ओव्हरलोडची कारवाई करण्यात येऊ नये, यासाठी खासगी एजंटमार्फत १८ हजार रुपयांची लाच घेताना प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आरोपींमध्ये मोटर वाहन निरीक्षक राजू मुरलीधर नागरे (वय ३९, रा. नाशिक) आणि एजंट संदीप रामदास ढोले (रा. साईदीपनगर, बीड बायपास) यांचा समावेश आहे. तक्रारदाराचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून, त्याच्या मालकीचे आयशर कंपनीचे सहा चाकी वाहन आहे. सदर वाहनाने तक्रारदार हे तुरीची डाळ व इतर कडधान्याची जालना ते मुंबई अशी वाहतूक करतात. हे वाहन छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीतून सुरळीत चालू द्यायचे असेल व वाहनावर ओव्हरलोडची कारवाई होऊ द्यायची नसेल तर खासगी एजंट संदीप ढोलेने वाहन निरीक्षक नागरे याच्यासाठी २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी अहिल्यानगरच्या एसीबीकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार पथकाने लाचेची पडताळणी केली. त्यात तडजोडीअंती १८ हजार रुपयांत व्यवहार ठरला. त्यानुसार मंगळवारी एसीबीच्या पथकाने आरटीओ कार्यालयाच्या परिसरात सापळा लावला. त्यात संदीपने १८ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली. त्यासाठी निरीक्षक नागरे याने प्रोत्साहन दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. ही कारवाई सापळा व तपास अधिकारी पोलिस निरीक्षक राजू आल्हाट, पोलिस हवालदार राधा खेमनर, रवींद्र निमसे, चंद्रकांत काळे, हारून शेख यांच्या पथकाने केली.

दोन्ही आरोपी गजाआड
एसीबीच्या पथकाने ढोले यास लाच घेतानाच पकडले. त्यानंतर निरीक्षक नागरे यास कार्यालयातून ताब्यात घेतले. मध्यरात्री वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: RTO inspector arrested by ACB for accepting bribe of Rs 18,000 to avoid action against overloaded vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.