सेवानिवृत्त अंध शिक्षकाला घातला ४० लाखांचा गंडा; दोघे अटक, एक फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 14:08 IST2020-08-14T14:03:14+5:302020-08-14T14:08:26+5:30
सेवानिवृत्तीनंतर मिळालेले पैसे गुंतविण्याच्या उद्देशाने तिघांसोबत व्यवहार

सेवानिवृत्त अंध शिक्षकाला घातला ४० लाखांचा गंडा; दोघे अटक, एक फरार
वाळूज महानगर : गाळे व जमीन खरेदीचे आमिष दाखवून बजाजनगरातील सेवानिवृत्त अंध शिक्षकाला ४० लाखांचा गंडा घालणाऱ्या तिघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी व्यंकट अप्पाराव बन्सोडे व माधवराव गवारे याला अटक केली आहे. भरत पगडे हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
व्यंकट ग्यानोबा बन्सोडे हे सेवानिवृत्त अंध शिक्षक आहेत. २०१४ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर ते पत्नी जानकीबाईसोबत बजाजनगरात राहत आहेत. त्यांना मूलबाळ नाही. सेवानिवृत्तीनंतर मिळालेले पैसे गुंतविण्याच्या उद्देशाने व्यंकट अप्पासाहेब बन्सोडे (रा. बजाजनगर) याच्यामार्फत माधवराव गवारे (रा. एन-११) व भाऊराव पगडे (रा. बेगमपुरा) याच्यासोबत जुलै २०१४ मध्ये पंढरपूरमध्ये बँकेने जप्त केलेल्या गाळे खरेदीचा व्यवहार सुरू केला. याचा ४० लाखांत सौदा ठरला. २०१४ ते २०१६ या काळात व्यंकट बन्सोडे याला त्यांनी ३६ लाख रुपये दिले.
मात्र, त्यानंतरही व्यंकट गाळ्याची कागदपत्रे देत नसल्याने या दाम्पत्याने तिघांची भेट घेतली. यावेळी तिघांनी चालढकल केली. पाठपुरावा केल्यानंतर दोन महिन्यांत पैसे देण्याच्या बोलीवर हमी म्हणून माधवराव गवारे याने १९ लाखांचा व भरत पगडे याने ८ लाख ३० हजारांचा धनादेश दिला. तरीही मुदतीत पैसे परत दिले नाहीत. तिघांनी पुन्हा पैशांच्या मोबदल्यात जमिनीचे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांनी बन्सोडे दाम्पत्याकडून पुन्हा ३ लाख ७३ हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यंकट ग्यानोबा बन्सोडे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. यावरून व्यंकट अप्पाराव बन्सोडे, माधवराव गवारे व भरत पगडे याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.